सीबीएसई पॅटर्ननुसार एक एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल, ही घोषणा केली होती. नंतर अलीकडेच शिक्षणमंत्र्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न सुरू करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. यामुळे खळबळ उडणे साहजिकच होते. याबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या. हे बघितल्यानंतर काही प्रमाणात गैरसमज असल्याचे दिसून आले. यावर ऊहापोह करणे आवश्यक वाटते.
१) पॅटर्न: सर्वात अधिक वापरला गेलेला शब्द 'पॅटर्न' आणि तोही 'सीबीएसई पॅटर्न'. जणू सीबीएसई पॅटर्न ठरवते, असा समज असण्याची शक्यता यातून निर्माण होते. तर तसे नाही. पॅटर्न देशाचे किंवा राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवत असते. कोठारी कमिशनच्या पूर्वी आपल्या राज्यात दहावी व अकरावी असा पॅटर्न होता. कोठारी कमिशननंतर केंद्राप्रमाणेच १०+१२ असा पॅटर्न आपण स्वीकारला. केंद्र आणि आपल्या राज्यात थोडा फरक तरी होताच. तो म्हणजे ४+३+३+२ असा. म्हणजे १ ते ४ प्राथमिक, ५ ते ७ उच्च प्राथमिक ८ ते १० माध्यमिक ११ व १२ उच्च माध्यमिक. उत्तरेकडील बहुतेक राज्यात मात्र ५+३+२+२ असा पॅटर्न होता. सर्वशिक्षा अभियान आल्यावर या पॅटर्ननुसार निधी मंजूर व्हायला लागला. त्यामुळे आपल्या राज्यात पॅटर्न नसताना १ ते ५ व ६ ते ८ असे आराखडे तयार करून सादर करावे लागले होते. नंतर २०२० साली केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि आपल्या राज्याने ते स्वीकारले. म्हणून आपला पॅटर्न त्याप्रमाणे ५+३+३+२+२ असा झाला. सीबीएसईचा असा कोणताही वेगळा पॅटर्न नाही हे यावरून स्पष्ट व्हावे. कागदोपत्री जरी हा पॅटर्न स्वीकारला तरी बहुतेक शाळा १ ते ४, १ ते ७ आणि ५ ते १० अशाच आहे. अजूनही प्रथमिकला पाचवा आणि उच्च प्रथमिकला आठवा वर्ग जोडला नाही.
२) राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा (एनसीई) देशाचे शैक्षणिक धोरणाने शिक्षणाचे
उद्दिष्ट ठरते. त्या उद्दिष्टांना अनुसरून मार्गदर्शक आराखडा तयार केला जातो. जी अपेक्षा धोरण व उद्दिष्टांत केली जाते त्याचे ते प्रतिबिंब यात असते.
३) अभ्यासक्रम: अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा (एनसीएफ) च्या
मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित विशिष्ट शैक्षणिक स्तरासाठी तयार केला असतो. यात कोणत्या विषयांचा समावेश असेल, कोणते कौशल्य शिकवले जाईल आणि शिक्षणाची उद्दिष्टे काय असतील हे ठरवले जाते. एनसीएफच्या व्यापक दृष्टिकोनाला अभ्यासक्रम व्यावहारिक स्वरूपात रूपांतरित करतो, जेणेकरून शिक्षकांना शिकवण्यासाठी स्पष्ट दिशा मिळते.
४) पाठ्यपुस्तके : पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमाच्या आधारे तयार केलेली प्रत्यक्ष
अध्ययन/अध्यापन साधने असतात. ती अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयांचे आणि संकल्पनांचे सविस्तर वर्णन करतात आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत माहिती पुरवतात. अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आपल्या देशात एनसीईआरटी तयार करत असते. सीबीएसई आराखडा, पॅटर्न, अभ्यासक्रम वा पुस्तके तयार करत नाही, हे यावरून स्पष्ट होईल.
५) सीबीएसई बोर्ड : १९२९ मध्ये बोर्ड ऑफ हायस्कूल अॅन्ड इंटरमिजिएट एज्युकेशन, राजपुताना म्हणून याची स्थापना झाली होती. त्यानंतर १९५२ मध्ये या बोर्डाचे नाव बदलून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ठेवण्यात आले. केंद्र शासनात जे नोकरीवर आहेत किंवा इतर आस्थापनातील कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या झाल्यास त्यांना या बोर्डाशी संलग्नित शाळांत तोच अभ्यासक्रम असतो. थोडक्यात सीबीएसई भारतातील राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे जे शाळांमध्ये अभ्यासक्रम लागू करते आणि दहावी व बारावीच्या परीक्षा घेते. ६) एनसीईआरटीची भूमिका एनसीईआरटी स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्य करते. ती शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य विकसित करते.
या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती
१) पॅटर्न: आपण १९७५ पासूनच कोठारी कमिशनने ठरवलेला पॅटर्न राबवत आहोत. केवळ काही प्रमाणात प्राथमिक माध्यमिक वर्गाचे वर्ष वेगळे होते. आता तेसुद्धा राहणार नाही. कारण २०२० राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केला. म्हणजे आपण पॅटर्न राबवतच आलो आणि राबवणार आहे. यात नवीन काहीच नाही.
२) अभ्यासक्रम आजच नाही तर आपण कोठारी कमिशनपासूनच केंद्रीय अभ्यासक्रमाचा विचार करून आपला अभ्यासक्रम बेतत आलेलो आहे. अगदी अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ अनुसरून राज्य शैक्षणिक आराखडा तयार केला. त्यातील थोडा थोडका नाही तर ७० टक्के अभ्यासक्रम एनसीईआरटीचा आणि ३० टक्के राज्याचा आहे. हे प्रमाण तसंच राहील. म्हणूनच आपल्या राज्याच्या सुकाणू समितीला अभ्यासक्रम तयार करवा लागला. तो एससीईआरटीने तयार केला. जर केंद्राचाच वापरायचा असता तर आपण तयार करण्याची गरज नव्हती. पण तसे नाही.
३) पाठ्यपुस्तके, बालभारती आणि एससीईआरटी बराच गैरसमज असा आहे की सीबीएसईची पुस्तके वापरली जातील. मुळात सीबीएसईची पुस्तके नसतातच. ती एनसीईआरटीने तयार केलेली असतात. सर्वच सीबीएसई शाळा सर्वच पुस्तके एनसीईआरटीने तयार केलेली वापरत नाहीत, तर खाजगी प्रकाशकांचीसुद्धा वापरतात. काही शाळा तर स्वतःच्या शाळेचे नाव छापून पुस्तके मुलांना देतात. आपल्या राज्यात अभ्यासक्रम एससीईआरटी तयार करते. बालभारती सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्याखाली रजिस्टर झालेली स्वायत्त संस्था आहे. ती पुस्तकांचा वर्गवार विषयवार मसुदा तयार करते. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती त्या मसुद्याला मान्यता देते आणि पुस्तके बालभारती छापून तयार करते व वितरित करते. यात सीबीएसईची पुस्तके वापरण्याचा प्रश्नच येत नाही.
४) राज्याचे शिक्षण मंडळ अभ्यासक्रम एनसईआरटीचा (सीबीएसईचा स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. चुकीने मंत्रीसुद्धा सीबीएसई अभ्यासक्रम असा शब्द वापरतात)
स्वीकारणार असलो तरी आपल्या शाळा आपल्या राज्याच्या मंडळाला संलग्नित आहे. म्हणजे परीक्षा आपले मंडळच घेणार आहे. ते आपल्या सोयीने घेणार. ५) शिक्षणाचे सत्र: सीबीएसई शाळांचे सत्र एक एप्रिलपासून सुरू होते तर आपले जून महिन्यात राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामनाप्रमाणे निरनिराळ्या तारखांना सुरू होते. जरी आपण आपले सत्र आपल्या सोयीने घेऊ शकत असलो तरी मंत्र्यांनी पुढील वर्षी एक एप्रिलपासून सुरू करण्याचा मानस दर्शविला आहे. त्यात मतमतांतरे असतील. मला स्वतःला एक एप्रिलपासून सुरू करणे योग्य राहील, असे वाटते. परीक्षा मार्चमध्ये संपतील. निकाल लागतील. एक एप्रिलपासून सत्र सुरू झाल्यास उन्हाच्या वेळी सकाळी येण्यास संगता येईल. तसेच तयारी करण्यास एक वर्ष हातात असेल. त्यात पुस्तकांची छपाई, मुलांना द्यावयाचे गणवेश किंवा इतर सुविधांची तयारी पूर्ण होऊ शकेल.
माजी शिक्षण सहसंचालक, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांनी विधिमंडळात महाराष्ट्रात सीबीएसइ अभ्यासक्रम राबवण्याबाबत घोषणा केली आहे. याबाबत मात्र अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. ते संभ्रम दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण म्हणून प्रसिद्ध करण्यात येऊन ते संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात सी बी एस इ अभ्यासक्रम कशा पद्धतीने अमलात आणण्यात येणार? याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांची परिक्षा पध्दती स्विकारण्याविषयीची भूमिका.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक बंधुभगिनीनी अतिशय कमी माहिती उपलब्ध असताना सुध्दा नविन शैक्षणिक धोरणाबाबत शासनाची भूमिका समजुन घेतली त्याबाबत आभार.
राज्यातील सुजाण पालक यांचा सहभाग व शिक्षक बंधुभगिनींची सकारात्मक प्रयत्नांची भूमिका या माध्यमातून नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रगतीशील महाराष्ट्रात करण्यात येईल.
तथापि माहिती पुर्ण न मिळाल्यामुळे काही समज-गैरसमज निर्माण झालेत त्यासाठी हा खुलासा करण्यात येत आहे.
१ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत बनविलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत. यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
२ महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत.
३ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारीत परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या परीक्षा पध्दतीप्रमाणे सर्वंकष प्रकारचे मुल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पध्दतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल / सुधारणा करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
४ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा स्विकार करुन महाराष्ट्राने दिनांक २४ जून २०२२ रोजी चा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानंतर तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली.
सर्व मसुदे SCERT च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता दि. ०९.०९.२०२४ मिळाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तराचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि. २०/१०/२०२३ ते दि. ०४/११/२०२३ ठेवण्यात आला. यासाठी एकूण २८४३ प्रतिक्रिया आल्या होत्या. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि.१७/०२/२०२४ ते दि. ०३/०३/२०२४ ठेवण्यात आला. यासाठी एकूण २७५ प्रतिक्रिया आल्या होत्या. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण साठी आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दि.२३/०५/२०२४ ते दि. ०३/०६/२०२४ ठेवण्यात आला. यासाठी एकूण ३६०६ प्रतिक्रिया आल्या होत्या.
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालिन मंत्री, शालेय शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी (बालवाटिका १,२,३, इ. १ ली व २ री) अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे.
नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ. १ ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. १ री ते १० वी साठी अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती SCERTM मार्फत करण्यात येत आहे.
५ CBSE च्या परीक्षापध्दतीची वैशिष्टये :-
अ) संकल्पनांवर भर - पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते.
ब) सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (CCE Continuous and Comprehensive Evaluation) - विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता, प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो.
क) राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते.
ड) स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो.
इ) सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यांना संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते.
ई) CBSE पॅटर्नमुळे विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते.
६. नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यसाहित्य पुढील वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे:
सीबीएससी अभ्यासक्रम हा यावर्षी पहिल्या वर्गासाठी लागू असेल तर 2026 मध्ये दुसरी तिसरी चौथी व सहावीला तो लागू होईल.
2027 मध्ये पाचवी सातवी नववी व अकरावी साठी सीबीएसइ अभ्यासक्रम लागू होणार आहे.
2028 मध्ये आठवी दहावी व बारावी या वर्गासाठी सदर अभ्यासक्रम लागू होईल.
महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट, राज्यमंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे २१ व्या शतकातील गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास मदतच करेल. राज्यातील इ.१० वी व इ.१२वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्यमंडळाकडेच असेल.
राज्यमंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही.
महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इ. सर्व संबंधीत विषयामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. SCF-SE मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळेल व हा निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाची, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरुन करण्यात येत आहेत. शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय दि. २३/०८/२०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशैक्षणिक कामाचा ताण कमी करून शैक्षणिक कामच शिक्षकांकडून केले जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे ज्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे, तंत्रज्ञानाची जोड व निपुण महाराष्ट्र सारखे अभियानही सुरु करण्यात आले आहे.
शाळांच्या भौतिक सुविधा उदा. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वर्ग खोल्या, किडांगण, कुंपन इ-सुविधा वगैरे या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे, यावर शासन प्राधान्याने काम करेल.
मा. मुख्यमंत्री महोदय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री महोदय श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या जिव्हाळयाचा हा विभाग असल्याने चांगल्या कामांसाठी पुर्ण समर्थन असेल आणि याकरीता कुठलाही निधी कमी पडणार नाही. येणाऱ्या काही वर्षात या विभागाचे चित्र पुर्णपणे बदललेले दिसेल.
वेळापत्रकासंदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे.
शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्स द्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही कारण की सर्वांना ज्ञात असेल की बऱ्याच क्षेत्रांमध्ये वरील पातळीवर स्पर्धा परीक्षांद द्वारे निवड होणारे विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधीलच आहेत तसेच नवीन अभ्यासक्रम आराखडा यात आणखी भर घालणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धाक्षम होता येईल.
वरील संपूर्ण बाबी लक्षात घेता.
१) राज्य शासन जसेच्या तसे सीबीएसइ चे पुस्तके विद्यार्थ्यांसाठी वापरणार नाही.
२) राज्य शासन राज्यासाठी स्वतंत्र पुस्तक निर्मिती करणार त्यामुळे बालभारती बंद होणार नाही.
३) राज्य शासन बालभारती द्वारे स्वतंत्र पुस्तके तयार करणार म्हणजे आपल्या राज्यातील सांस्कृतिक व इतर सर्व बाबी त्यामध्ये समाविष्ट असणार.
४) गरज भासल्यास त्या त्या विषयाची मराठी भाषेत देखील पुस्तके उपलब्ध होणार.
५) सीबीएसई अभ्यासक्रम हा खूप वेगळा नाही त्यामुळे लगेच शिक्षकांना (रॉकेट सायन्स) सारख्या गहन विषयाचे ट्रेडिंग देण्याची गरज नाही. म्हणजेच नेहमीप्रमाणे अभ्यासक्रम जसा बदलतो त्याप्रमाणे अभ्यासक्रमात बदल होऊन नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत त्याचे प्रशिक्षण देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद शिक्षकांना टप्प्याटप्प्याने देणार आहे.
६) राज्याचा सीबीएससी अभ्यासक्रम म्हणजे एन ए पी 2020 च्या अनुषंगाने राज्याने अभ्यासक्रमात केलेला बदल होय.
राज्य शासनातर्फे निर्गमित संपूर्ण प्रेस नोट पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
खूप सुंदर अपडेट्स जाधव सर
ReplyDelete🙏
Delete