महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेश निर्णय यानुसार नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान किंवा उच्चश्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
वाचा :-
१) शासन निर्णय क्र. एसएसएन १०९९/(३४०/९९)/माशि-२ दि. १३/१०/२०००
२) शासन निर्णय क्र.:-पीआरई-२००२/३३९५/प्राशि-१, दि. २७/०२/२००३
३) शासन निर्णय क्र. एसएसएन-१०१०/(२७७/१०)/माशि-२, दि. १५/०९/२०११
४) शासन निर्णय क्र. सीईटी २०१५/प्र.क्र.१४९/टिएनटी-१, दि. ०७/०२/२०१९
प्रस्तावना :-
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची निवड पूर्वी केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारे तर खाजगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ मधील तरतूदीनुसार विहीत प्रक्रियेद्वारे संबंधित खाजगी व्यवस्थापनामार्फत करण्यात येत होती. तथापि, संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदीनुसार सद्यस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे (स्वयंअर्थसहाय्यित, अल्पसंख्याक संस्था संचलित व इंग्रजी माध्यमाच्या कायम विना अनुदानित शाळा वगळता) अभियोग्यता व बुद्धीमता चाचणीतील गुणांच्या आधारे "पवित्र" या संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येत आहेत.
तथापि, कार्यरत नियमित शिक्षकाची उच्च अर्हता प्राप्त करुन नामनिर्देशनाद्वारे / स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊनही उच्च/असमान पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण नसल्याच्या संदर्भाकित क्र.३ येथील शासन निर्णयातील अटीमुळे अशा शिक्षकास पूर्वी केलेल्या सेवेचा लाभ नवीन नियुक्ती वेळी होत नसल्याने त्यास अशी नवीन नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते. त्यामुळे अशा नियमित कार्यरत शिक्षकाने नामनिर्देशाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊन नवीन नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. सदर मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. १५/९/२०११ मधील अट/शर्त क्र. ३ मध्ये सुधारणा करण्यात येऊन नियमित कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दूस-या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात)
पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पूर्वीच्या पदावरील वेतनास संरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे /स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दूस- या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी खालील अटी व शर्ती लागू राहतील:-
(१) स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पुर्वीची नियुक्ती ही विहीत मार्गाने/प्रक्रियेद्वारे झालेली असावी.
(२) पुर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी तसेच वेतन अनुदान मिळत असावे,
(३) पुर्वीची नियुक्ती विहीत मार्गाने/प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतनश्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकाची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही. तथापि, शासन निर्णय दि. १५/०९/२०११ नुसार अशा शिक्षकास शिक्षण सेवक योजना लागू होणार नसल्याने, त्याचे वेतन नव्याने नियुक्त पदास लागू वेतनश्रेणीच्या किमान टप्यावर निश्चित करण्यात येईल.
(४) पुर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये सेवाखंड असल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही. तथापि, पूर्वीच्या पदावरुन कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधी अनुज्ञेय असेल.
(५) समान तसेच उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार नाही.
(६) अन्य व्यवस्थापनाकडे निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील पदाची वेतनश्रेणी समान असल्यास कर्मचा-यास पूर्वीच्या पदावरील सेवाज्येष्ठता लागू होणार नाही. तथापि, पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राहय धरुन वरिष्ठ/निवडश्रेणीचे लाभ देय होतील.
(७) एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतनश्रेणीतील पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास शिक्षकास उच्च वेतनश्रेणीतील नवीन पदाच्या सेवाशर्ती तसेच सेवाज्येष्ठता लागू होईल. त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा वरिष्ठ/निवडश्रेणीच्या लाभासाठी ग्राहय होणार नाही.
(८) शासन निर्णय दि. १५/०९/२०११ नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पुर्वीची सेवा सेवानिवृत्तीवेतनासाठी ग्राहय राहील.
(९) पवित्र प्रणालीमार्फत नव्याने शिक्षण सेवक पदी निवड होऊन रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतन संरक्षणास मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांचेकडून करण्यात येईल. सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधितांस सदर पदांचे मुळ वेतन देय राहील. (१०) सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिविक्षाधिन कालावधी लागू राहील.
सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३६८५/२१/सेवा-३, दिनांक २. २६/०८/२०२१ च्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१२१६१७२७४७९७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
TUSHAR VASANT MAHAJAN
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments