PM-Poshan Update - शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता परसबाग रजिस्ट्रेशन बाबत मार्गदर्शक सूचना लिंक शासन आदेश

परसबाग रजिस्ट्रेशन बाबत

प्रति

मुख्याध्यापक सर्व,


आपणास कळविण्यात येते की, शासन आदेशानुसार परसबाग प्रत्येक शाळेत तयार करणे आवश्यक आहे त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी :-


सर्व प्रथम गुगल क्रोम मध्ये www.udisepluse.gov.in या साईटवर जाऊन आपल्या शाळेचा यु डायस व पासवर्ड ने लॉगिन करून

 school profile & facilities management 

या मॉड्युल वर जावे 

व सुरवातीपासून संपूर्ण फॉर्म भरावा व  त्यामध्ये 2.17 a या परसबाग च्या मुद्द्याला yes ला क्लिक करावे

 संपूर्ण फॉर्म पूर्ण भरल्याशिवाय सदरचे मॉड्युल सेव्ह होणार नाही.

व सेव्ह झाल्याशिवाय आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही

तरी आपण सर्वांनी वरीलप्रमाणे कृती करून तात्काळ रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.




 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक: २५ जुलै, २०२४.


१)शाळांमध्ये परसबागांबाबत (School Nutrition Gardens) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.१५ ऑक्टोंबर, २०१९.

२) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.२१ डिसेंबर, २०२२. 

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३. दि.११ जुलै, २०२३.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३ दि.०५ सप्टेंबर, २०२३.

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ.क्र.प्र/२०१८-१.डी.एस/७१३. दि. २७ फेब्रुवारी, २०२४.

६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३. दि.२१ जून, २०२४.


प्रस्तावना:-

केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची समिती शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२३ अन्वये गठीत करण्यात आली होती. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्य) आहार देण्याचा निर्णय दि.११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये मोड आलेल्या कडधान्य (स्प्राऊट्स) या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा, टोमॅटो, कोबी, लिंबू इ. बाबींचा समावेश करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी तसेच परसबागेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक :-

१) केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील योजनेस पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला इ. पदार्थांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

२) राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याकरीता मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे राहतील.

३) प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०७२५१४५३४०४३२१ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(प्रमोद पाटील)

 अवर सचिव, महाराष्ट्र शासन




परिशिष्ट

शालेय परसबाग:- शाळेच्या लगतच्या मोकळ्या आवारात पौष्टिक भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती

इ. यांची लागवड करुन तयार केलेल्या बागेस शालेय परसबाग असे संबोधतात.


१. शालेय परसबाग संकल्पनेची वैशिष्ट्ये :

1. मर्यादित जागेचा वापरः शाळेमध्ये परसबागेची निर्मिती कुठेही केली जावू शकते. परसबागेसाठी मोकळ्या जागेचा मोठ्या भूखंडाची आवश्यकता नाही. आरोग्यदायी भाज्यांची लागवड कुंडी, कंटेनर यामध्येही करता येते. तसेच, सदर लागवड शाळेच्या गच्चीवर, छतावर किंवा शाळेच्या प्रवेशद्वारावरही करता येते. वेलवर्गीय वाणांची लागवड कुंडीत केल्यास सदर वेल भिंतीवर रेंगाळतात आणि त्यांना जमिनीची गरज नसते. मर्यादित जागेचा महत्तम वापर कसा करता येतो ही बाब परसबाग निर्मितीमधून विद्यार्थ्यांना शिकवली जावू शकते.

ii. भाजीपाल्यामधील वैविधताः परसबागेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची व फळांचे उत्पादन घेणे शक्य आहे. काही अपवाद वगळता, भाज्या किंवा फळांचा प्रत्येक भाग खाऊ शकतो. देशाच्या अनेक भागांमध्ये भाज्यांचे वेगवेगळे भाग जसे की फुले, पाने आणि देठ हे सर्व खाल्ले जातात. उदा. केळीच्या फुलांचा काही पाककृतींमध्ये समाविष्ट केले जाते, तर पपईची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहेत. अशाप्रकारे भाजीपाल्याची वैविधता विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यास परसबागेची मदत होते.

iii. नाविन्यतेस चालना:- विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करायला आणि मार्ग शोधायला परसबाग फायदेशीर ठरते. शाळेत परसबाग निर्मिती न करण्यासाठी शाळेत जागेची व पाण्याची असणारी कमतरता, आवश्यक संसाधने उपलब्ध नसणे इत्यादी कारणे असू शकतात. मुलांना सदर अडचणीवर मात करुन परसबाग निर्मितीस चालना दिल्यास त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळेल. स्थानिक परिस्थिती, जमीन आणि हवामानाला अनुकूल असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखून त्याची लागवड करणे आणि ठिबक सिंचनाच्या सोप्या पद्धतीद्वारे बागेत पाणी देण्याचे विविध मार्ग विद्यार्थी शोधू शकतात. स्थानिक तज्ञ आणि शेतकऱ्यांनी त्यांचे कौशल्य विद्यार्थ्यांना सांगितल्यास विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यावर भर देतील.

iv. ज्ञानाचा उपयोग समाजासाठी:- विद्यार्थ्यांना परसबागेसंदर्भात शाळेमध्ये प्राप्त ज्ञानाच्या आधारे त्यांना त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरात परसबाग सुरू करण्यास प्रवृत्त केले जावू शकते. शाळांमध्ये परसबाग निर्मिती करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना कौशल्याधारित ज्ञान देणे आणि शाळेत शिकलेल्या ज्ञानाचा वापर करून उपलब्ध साधनसामुग्रीत घरच्या परिसरात परसबाग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

v. लोकसहभागः- ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील सर्व शाळांमध्ये शालेय परसबाग विकसित करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवासी यांचा सहभाग आवश्यक आहे. तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण, बियाणे, रोपे, सेंद्रिय खत इत्यादीची तरतूद विविध विभाग/संस्था जसे की कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठे, वन विभाग इ. यांच्याशी समन्वय साधून प्राप्त करुन घेता येतो. मनरेगा अंतर्गत संरक्षण सीमा बांधणे, जमिनीचे सपाटीकरण इत्यादी उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात.

vi. निसर्गाशी जवळीक:- शाळेच्या आवारात काम करणे आणि स्वतःच्या आहारासाठी भाजीपाला पिकवणे हे शालेय मुलांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचे एक उत्तम उदाहरण आहे. शाळांमध्ये परसबाग निर्मितीचा हा महत्वाचा फायदा आहे. विद्यार्थ्यांना जमिनीतून बीज अंकुरणे व त्याची परिपूर्ण वाढ होणे हे पाहण्याचा / अनुभवण्याचा आनंद अतुलनीय आहे. बीजाची लागवड ते पूर्ण वाढ हया प्रकियेत विद्यार्थी जबाबदाऱ्या, सजीवांची काळजी घेणे, सामुहिक कार्य, सामाजिक कौशल्ये आणि निरोगी अन्न पर्यायांबद्दल शिकतात.

vii. Eco-Club स्थापना: इको क्लब हा शाळांमधील मुलांचा आणि शिक्षकांचा समूह आहे जो पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यासाठी योगदान देण्यासाठी कार्य करतो. परसबाग निर्मितीमुळे शाळांमधील इको-क्लब विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि पर्यावरर्णीय संवर्धनाचे प्रकल्प हाती घेण्यास सक्षम बनवतो.

२. परसबाग निर्मिती उदिष्टेः शालेय परसबागेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.ण्य

1. ताज्या पिकवलेल्या भाज्यांच्या सेवनाने कुपोषण आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यात मदत करणे.

#. मुलांना निसर्ग आणि बागकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे.

. भाज्यांच्या पौष्टिक पैलूंबद्दल आणि जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल मुलांचे ज्ञान वाढवणे.

३. शालेय परसबागेची गरज आणि फायदे:-

शालेय परसबागेचे फायदे खालीलप्रमाणे आहेतः-

1. शिक्षणः परसबाग निर्मिती व विकास हे व्यावहारिक व थेट शिक्षणाचे एक चांगले उदाहरण आहे. जेथे विद्यार्थी पौष्टीक अन्न कसे उत्पादित करायचे हे शिकतात. तसेच, परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळांच्या सेवनामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही तर उत्पादित भाजीपाल्यामुळे माणसास उपजिविकेची संधी मिळून तो आत्मिनिर्भर बनतो, हे जीवनातील व्यावहारिक बाजूचे शिक्षण मुलांना मिळते. शेती व फलोत्पादनातील व्यावहारिक कौशल्याव्यतिरिक्त परसबागा या पर्यावरणावियक समस्या व जीवन विज्ञानाच्या अभ्यासासाठी एक सजीव प्रयोगशाळा आहे.

ⅱ. आरोग्यः परसबाग निर्मिती मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी फायदेशीर आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शारिरीक, बौध्दिक व मानसिक क्षमतांवाढीसाठी मुलांना चांगला आहार आवश्यक आहे. परसबागेमध्ये पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाला व फळांमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सदर भाजीपाल्याचा मुलांच्या आहारातील समावेशनामुळे आहारात पौष्टिक मूल्यांची वाढ होते.

iii. पर्यावरणः परसबाग निर्मितीमुळे पर्यावरण सुधारते. शाळेच्या मैदान हे नैसर्गिक वातावरण, तयार केलेले कृत्रिम वातावरण आणि सामाजिक वातावरण या तीन घटकामध्ये विभागले जाते. माती, झाडे, कीटक आणि वन्यजीव, सूर्य प्रकाश आणि सावली, पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुविधा, मार्ग, कुंपण, इमारती आणि अभ्यासासाठी ठिकाणे या बाबी सामाजिक जीवन आणि बाह्य जगाशी संपर्कासाठी मुलांना उपयुक्त ठरतात.

IV. नैसर्गिक स्वास्थ संवर्धनः सेंद्रिय बागकामामुळे मातीचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी एकरुप होऊन काम केले जाते. परसबाग निर्मिती ही अन्न पिकवण्याची एक पद्धत आहे. जमीन, सूर्य, हवा, पाऊस, वनस्पती, प्राणी आणि लोक पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. सेंद्रिय बागेमुळे माती सुपीक आणि निरोगी राहते. कीटक आणि रोगांचे नियंत्रण होते. तसेच, सेंद्रिय पद्धती आपले जलस्रोत स्वच्छ आणि रसायनांपासून मुक्त ठेवण्यास मदत करतात.

v. निसर्गाशी जवळीक:- निसर्गाच्या जवळ असलेली मुले आनंददायी असतात. पुस्तक, शब्द किंवा पुस्तकातील विविध संकल्पना शिकण्यापलिकडे विद्यार्थ्यांना होणारा आनंद हा पर्यावरणीय शिक्षणाला दिशा आणि प्रेरणा देतो. सुरुवातीच्या काळात पर्यावरणीय शिक्षण हे आश्चर्य आणि शोधाच्या आनंदावर आधारित असले पाहिजे. परसबाग निर्मितीमुळे सदर बाब साध्य होण्यास मदत होते.

vi. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढः परसबागेव्दारे विद्यार्थी त्यांच्या पालकांना आणि समाजाला चांगले पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. परसबाग निर्मिती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाच्या मर्यादेपलीकडे पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती शोधण्यासाठी सक्षम करते.

४. हवामान बदलाचा परिणाम आणि शालेय परसबागांची उपयुक्ताः-

1. मानवाच्या विविध वर्तनाचा हवामानावर परिणाम होत असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

ii. वनस्पती, झाडे, भाजीपाला आणि फळझाडे हवामान बदलाचे हानिकारक प्रभाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलतोड हे हवेची गुणवत्ता कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. झाडे आणि इतर वनस्पर्तीच्या नाशामुळे हवामान बदल,

वाळवंटीकरण, मातीची धूप, कमी पिके, पूर येणे, वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे इ. बाबी घडत आहेत.

iii. शास्त्रज्ञांच्या मते झाडे, भाजीपाला आणि फळझाडे लावणे हा हवामान संकटाचा सामना करण्याचा सर्वात मोठा आणि स्वस्त मार्ग आहे. जसजशी झाडे वाढतात तसतसे ते जागतिक उष्णता वाढीस कारणीभूत असलेले कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन शोषून घेतात आणि साठवून ठेवतात. नवीन झाडे लावल्याने वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड कमी होवून हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

iv. शालेय परसबाग ही पर्यावरण संवर्धनासाठी उत्तम आहे. कारण शालेय परसबागेमुळे भाजीपाला, फळे, शेंगा आदी बाबी शाळेतच मिळत असल्याने ते अन्य ठिकाणाहून मिळवण्यासाठी लागणारा वेळ व अंतर कमी झाल्याने वातावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी होण्यास मदत होते. शालेय परसबागेत आणि घराच्या आवारात झाडे, भाजीपाला आणि फळे लावल्यास वातावरणातील कार्बन जमिनीत साठवण्यास मदत होईल.

V. शालेय परसबागेत हंगामानुसार सेंद्रिय स्थानिक भाजीपाला आणि फळे लावणे शक्य आहे. त्यामुळे दुर अंतराहून वाहतूक करुन भाजीपाला आणण्यासाठी वापरण्यात येणारे इंधन व ते अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृहाचा वापर टाळता येतो.

vi. शालेय परसबागांमध्ये झाडे लावणे हा हवामान बदलाचे हानिकारक प्रभाव कमी करण्यासाठी एक पुढाकार असेल. योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८६,००० शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळांमध्ये शालेय परसबागेचा विकास केल्यास हवामानावर महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम होऊ शकतो.


५. जागा निश्चिती व आराखडा तयार करणे:-

1. परसबाग निर्मितीसाठी सपाट जमीन सर्वात सोयीस्कर आहे.

ii. परसबाग निर्मितीसाठी मुख्य घटक म्हणजे जमीनीचे याफे, पथ, रोपवाटिका, कंपोस्ट आणि बागेचे शेड हे आहे. मनरेगा योजनेतंर्गत सीमाभिंत बांधणे, जमिनीचे सपाटीकरण इत्यादी कामे करण्यात यावीत.

. उपलब्ध जागेचा विचार करुन अधिकाधिक भाजीपाला उत्पादित करण्याच्या दृष्टीने परसबागेचा आराखडा तयार करण्यात यावा.

iv. चांगला पाणीपुरवठा असल्यास पेरणीचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. जर पाणी टंचाई असेल तर, पाण्याचा वापर इष्टतम करण्यासाठी जलसंधारण, ठिबक सिंचन यासारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

६. कमी जागा असलेल्या ठिकाणी परसबाग निर्मितीः-

नागरी भागात आज शहरीकरणाच्या झपाट्याने बऱ्याच शाळांमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी मोकळी जागा नाही. नागरी भागातील शाळेत बाल्कनी, संरक्षण भिंतीलगत, व्हरांडा या ठिकाणी विविध उपाययोजनाव्दारे भाजीपाला निर्मिती करत्ता येते. यासाठी कंटेनरमध्ये भाजीपाला निर्मिती करणे अथवा हायड्रोपोलिक्स (Hydroponics) तंत्रज्ञानाव्दारे भाजीपाला निर्मिती करणे हे उत्तम पर्याय आहेत. कंटेनरमध्ये भाजीपाला निर्मिती करण्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1. विद्यार्थी भाजीपाला आणि फळे कंटेनरमध्ये वाढवायला शिकतात, यामुळे भाजीपाला लागवडी यासाठी मोठ्या जमिनीची आवश्यकता नाही. ॥. टाकावू कंटेनरचा पुनर्वापर होतो.

ⅲ. सेंद्रिय कचरा जसे की स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तू आणि सडणारी कोणतीही वस्तू अशा कंटेनरमध्ये प्रक्रिया करुन कंपोस्ट तयार केले जाऊ शकते.

iv. रोपांची काळजीपूर्वक निवड करून शाळेच्या परिसराचे तापमान कमी केले जाऊ शकते. देशाच्या उष्ण भागात हे खूप उपयुक्त आहे.

v. कोणत्याही ठिकाणी परसबाग प्रभावीपणे तयार केली जाऊ शकते हे समजून विद्यार्थी सर्जनशील आणि चौकटीबाहेर विचार करायला शिकतील.

vi. हिरवाईमुळे शाळेची शोभा वाढेल आणि ते विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक ठिकाण बनेल. vii. शालेय मुलांना मर्यादित जागेचा जास्तीत जास्त वापर करून एकात्मिक बागकामाचा सराव

करण्यास सक्षम करेल,


संपूर्ण शासन आदेश पीडीएफ डाउनलोड.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.