कबड्डी
1. क्रीडांगण मोजमाप (Ground Measurements): 11 x 8 मीटर (लहान गट व मोठा गट.)
2. वय व वजन (Age and Weight):
लहान गट -8 ते 11 वर्ष
वजन - 35 किलो पेक्षा कमी
मोठा गट
वय - 11 ते 14 वर्ष - 50 किलो पेक्षा कमी
3. क्रीडाक्षेत्र (Play Field): क्रीडांगणाच्या 11 मीटर x 8 मीटर विभागास क्रीडाक्षेत्र म्हणतात.
4. बाद खेळाडूसाठी बसण्याची जागा (Sitting Box): बाद झालेल्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा क्रीडांगणाच्या अंतिम रेषेपासून दोन मीटर अंतरावर असावी. त्याचे क्षेत्र खालील प्रमाणे आयताकृती असावे. लहान व मोठा गट मुले व मुलींसाठी 1 मीटर x 6 मीटर.
5. अंतिम मर्यादा (सीमा रेषा) (Boundary): क्रीडांगणाच्या चारही बाजूस असणाऱ्या रेषेस अंतिम मर्यादा म्हणतात. या रेषांची रुंदी 3 ते 5 सेंटीमीटर असावी.
6. राखीव क्षेत्र (Lobbies): क्रीडा क्षेत्राच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या । मीटर रुंदीच्या पट्ट्यास राखीव क्षेत्र म्हणतात. खेळाचे नियम या सदराखालीं नियम नंबर 4 प्रमाणे या राखीव क्षेत्राचा उपयोग ज्या वेळी केला जातो त्या वेळी क्रीडांगणाच्या अंतिम मर्यादा म्हणजे या राखीव क्षेत्रासह क्रीडांगणाच्या रेषा होत
7. मध्य रेषा (Mid Line): क्रीडांगणाचे दोन सम-समान विभाग करणाऱ्या रेषेस मध्य रेषा म्हणतात.
8. अंगण (Court): मध्य रेषेने विभागलेल्या क्रीडा क्षेत्राच्या प्रत्येक विभागास अंगण असे म्हणतात.
09. निदान रेषा (Baulk Line): मध्यरेषेस समांतर असणाऱ्या दोन्ही अंगणातील रेषांस निदान रेषा असे म्हणतात. मध्यरेषेपासून ही रेषा 3 मीटर अंतरावर राहील.
10. बोनस रेषा (Bonus Line): निदान रेषेपासून । मीटर अंतरावर अंतिम रेषेकडे समांतर असलेल्या रेषेस बोनस रेषा असे म्हणतात.
टीप: ज्यावेळी चढाई करणाऱ्याच्या शरीराचा कोणताही भाग जोपर्यंत प्रतिपक्षाच्या अंगणातील बोनस रेषा आणि अंतिम रेषा यामधील जमिनीस टेकलेल्या राहतो व शरीराच्या कुठल्याही भागाचा निदान रेषा व बोनस रेषा यामधील भागास स्पर्श नसतो, अशा वेळी बोनस रेषा ओलांडली गेली आहे असे समजावे.
11. दम (Cant): मान्य केलेला कबड्डी हा शब्द स्पष्ट स्वरात अखंडपणे एका श्वासात पुन्हा पुन्हा उच्चारीत जाणे यास दम असे म्हणतात. दम घेण्याची कालमर्यादा 30 सेकंदाची असेल.
12. चढाई करणारा (Raider): प्रतिपक्षाच्या अंगणात दम घालीत जाणाऱ्या खेळाडूस चढाई करणारा असे म्हणतात. चढाई करणाऱ्यांनी प्रतिपक्षाच्या अंगणात स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ करावयास हवा.
13. बचाव करणारा (Anti or Anti Raider): ज्या अंगणात चढाईची क्रिया सुरू असेल त्या अंगणातील प्रत्येक खेळाडू बचाव करणारा असे म्हणतात.
14. दम सोडणे किंवा जाणे (Losing The Cant): कबड्डी कबड्डी असा शब्द उच्चार सतत एकाच श्वासात करीत असताना मध्येच श्वास घेणे या क्रियेस दम सोडणे किंवा दम जाणे असे म्हणतात. दम घेणे व तो सुरू ठेवणे या दोन्ही क्रिया प्रथम घेतलेल्या एकाच श्वासात होणे आवश्यक आहे. एकच श्वास जास्तीत जास्त 30 सेकंदाचा असावा. जर चढाई करणाऱ्याने आपल्या अंगणात सुरक्षित येण्यासाठी 30 सेकंदाची काल मर्यादा ओलांडल्यास तो बाद झाला असे पंचांनी घोषित / जाहीर करावे.
15. गडी बाद करणे (To put out an Anti): नियमांचे उल्लंघन न करता चढाई करणा-याने बचाव करणाऱ्यास स्पर्श करणे किंवा चढाई करणाऱ्याच्या शरीराच्या कोणत्याही भागास बचाव करणाऱ्याचा स्पर्श होऊन चढाई करणाऱ्याच्या स्वतःच्या अंगणात दम न सोडता स्पर्श होणे या क्रियेस गडी बाद करणे असे म्हणतात.
16. गडी धरणे गडी पकडणे (To hold raider): नियमाचा भंग न करता बचाव करणाऱ्यांनी चढाई करणाऱ्यास त्याचा दम जाईपर्यंत आपल्या अंगणात धरून ठेवणे व त्यास त्याच्या अंगणात जाऊ न देणे किंवा सरपंच अथवा पंच यांनी शिटी वाजविण्यापर्यंत धरून ठेवणे या क्रियेस गडी धरणे अथवा गडी पकडणे असे म्हणतात.
17. अंगणात सुरक्षित येणे (To reach court safely): चढाई करणा-याने स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने मध्ये रेषा ओलांडून नियमाचे उल्लंघन न करता तीस सेकंदाच्या आत स्वतःच्या अंगणात स्पर्श करणे स्वतःच्या अंगणात सुरक्षित येणे असे म्हणतात.
18. स्पर्श (Touch): चढाई करणाऱ्याचा बचाव करणाऱ्यास किंवा करणाऱ्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागास कपड्याने, जोड्याने अथवा शरीराच्या कोणत्याही अवयवाने संपर्क झाला म्हणजे स्पर्श झाला असे म्हणतात.
19. झटापट (Struggle): जेव्हा बचाव करणाऱ्याचा अथवा करणाऱ्यांच्या चढाई करणाऱ्यास स्पर्श होतो त्या क्रियेस झटापट असे म्हणतात. स्पर्श अथवा झटापट झाल्यानंतर राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो.
20. चढाई (Raid): चढाई करणारा दम घेऊन प्रतिपक्षाच्या अंगणात प्रवेश करतो तेव्हा त्यास वेळ चढाई असे म्हणतात त्या प्रत्येक चढाईची कालमर्यादा 30 सेकंदाची असेल.
21. यशस्वी चढाई (Successful Raid): चढाई करणाऱ्यांनी चढाई करीत असताना प्रतिपक्षाच्या अंगणातील निदान रेषा एक वेळ तरी ओलांडून स्वतःच्या अंगणात दम घेत परत येणे या क्रियेस यशस्वी चढाई असे म्हणतात.
टीप:
अ) चढाई चालू असताना जर चढाई करणाऱ्याचा बचाव करणाऱ्या अथवा बचाव करणाऱ्यांचा चढाई करणाऱ्यास स्पर्श होतो अशा वेळी चढाई करणाऱ्यांनी निदान रेषा पार होण्याची आवश्यकता नाही, पण त्याने आपल्या अंगणात येईपर्यंत दम चालू ठेवावयास हवा.
ब) ज्यावेळी चढाई करणाऱ्याच्या शरीराचा कोणताही भाग जोपर्यंत प्रतिपक्षाच्या अंगणातील निदान रेषा आणि शेवटचे अंतिम रेषा यामधील जमिनीत टेकलेल्या व शरीराच्या कुठल्याही भागाचा मध्य रेषा व निदान रेषा यामधील भागात स्पर्श नसतो अशा वेळी निदान रेषा पूर्णपणे ओलांडली गेली असे समजावे.
22. पाठलाग (Pursuit): आपल्या अंगणात परत जाणाऱ्या चढाई करणाऱ्यास बाद करण्याच्या हेतूने बचाव करणारा नियमांचा भंग न करता दम घेऊन प्रतिपक्षाच्या अंगणात धावून जातो या क्रियेस पाठलाग असे म्हणतात.
खेळाचे नियम
1. नाणेफेक जिंकणाऱ्या संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहील आणि नाणेफेक हरणाऱ्यास अंगण अगर चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल. दुसऱ्या डावात अंगणाची अदलाबदल करावी आणि ज्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठवला नसेल त्या संघाने आपला खेळाडू चढाईस पाठवावा. पहिला डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू खेळत असतील तितक्याच खेळाडूंनी दुसरा डाव सुरू करावा.
2. खेळ चालू असताना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमीनीस स्पर्श झाल्यास तो खेळाडू बाद झाला असे समजावे, पण झटापटीच्या वेळी मात्र खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत जमीनीस लागलेला असेल तोपर्यंत तो बाद झाला असे होत नाही.
3. अ) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम मर्यादेबाहेर गेला तर तो बाद झाला असे समजावे. अशा खेळाडूस सामनाधिकाऱ्यांनी त्वरित क्रीडांगणा बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा पण सरपंच यांनी त्या खेळाडूचा क्रमांक सांगून बाद म्हणून मोठ्याने जाहीर करावे. चढाई चालू असेपर्यंत शिटी वाजवू नये.
ब) बचाव करणारा जर क्रमांक तीन अ च्या नियमान्वये क्रीडांगणाबाहेर गेला असेल व त्याने चढाई करणारास पकडले तर चढाई करणारा नाबाद जाहीर करावा. बचाव करणारा अगर करणारे क्रीडांगणा बाहेर गेल्याने बाद होऊनही परत पकडीत सहभागी झाल्यास त्याच्या या कृतीबाबत विरोधी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
4. झटापट सुरू झाली की राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो. झटापट संपल्यानंतर झटापटीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपापल्या अंगणात प्रवेश करीत असताना राखीव क्षेत्राचा उपयोग केला तरी चालेल. हा नियम फक्त बचाव करणाऱ्या च्या अंगणातील क्रियेस ग्राह्य धरला जाईल.
5. चढाई करणाऱ्यांनी दम घालण्याच्या वेळी कबड्डी हा शब्द उच्चार स्पष्ट केला पाहिजे. जर तो कबड्डी असा सुस्पष्ट दम घेत नसेल तर पंचाने त्यास परत पाठवावे आणि विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण देऊन पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी.
6. चढाई करणा-यांने प्रतिपक्षाच्या अंगणात स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ केला पाहिजे. जर त्याने उशिरा दम घालण्यास प्रारंभ केला तर पंच किंवा सरपंचाने विरुद्ध संघस एक तांत्रिक गुण जाहीर करून त्यास पुन्हा चढाईची संधी द्यावी.
7 . आपली पाळी नसताना जर एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंचांनी अथवा सरपंचांनी त्यास परत पाठवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
8. एका वेळेस फक्त एकच खेळाडूने प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस जावे. एका वेळी जर एकाहून अधिक खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने त्यांना परत बोलवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण जाहीर करून पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी.
9. चढाई करणारा परत आपल्या अंगणात आल्यावर किंवा प्रतिपक्षाच्या अंगणात बाद झाल्यास लागलीच दुसऱ्या संघाने आपला एक खेळाडू विरुद्ध संघाच्या अंगणात 5 सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा. अशा त-हेने आळीपाळीने चढाई करण्यास खेळाडू पाठविण्याचा क्रम खेळ संपेपर्यंत चालू ठेवावा. मात्र चढाई करणाऱ्याने चढाई करण्यासाठी 5 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतल्यास त्याची चढाईची पाळी संपली असे जाहीर करून विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व पुन्हा त्यांनाच चढाई करण्यास सांगावे.
10. चढाई करणाऱ्यास बचाव करणाऱ्यांनी पकडले असता चढाई करणारा जर त्यांच्या पकडीच्या प्रयत्नातून सुरक्षित आपल्या अंगणात आल्यास त्याचा पाठलाग करता येणार नाही. परंतु चढाई करणारा बचाव करणारा किंवा करणाऱ्यांना केवळ स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित परत जात असेल अशावेळी त्याचा पाठलाग करता येईल.
11. चढाई करत असताना प्रतिपक्षाच्या अंगणात जर चढाई करणाऱ्याचा दम गेला तर तो बाद झाला असे समजावे.
12. चढाई करताना पकडला गेल्यावर बचाव करणाऱ्यांनी बुद्धिपुरस्सर त्याच्या तोंडावर हात ठेवून त्यांच्या दमात अडथळा करू नये तसेच कोणत्याही स्वरूपाची केची अथवा दुखापत होईल असे आरोग्यास अपायकारक उपाय योजून पकड करू नये तसे घडल्याचे नजरेस आल्यास चढाई करणारा बाद नसल्याचे पंचांनी अथवा सरपंचानी जाहीर करावे.
13. बचाव करणाऱ्यांनी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्यास बुद्धीपुरस्पर अंतिम मर्यादेबाहेर ढकलू नये. तसेच चढाई करणाऱ्या बुद्धीपूरस्पर बचाव करणाऱ्या अंतिम मर्यादेबाहेर ओढू नये. जर चढाई करणारा अंतिम मर्यादेबाहेर ढकलला अगर ओढला गेला असेल तर पंचाने अथवा सरपंचाने अशा अंतिम मर्यादेबाहेर ढकलणाऱ्या अथवा ओढणाऱ्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
14. चढाई करणारा खेळाडू जोपर्यंत आपल्या अंगणात परत येत नाही तोपर्यंत बचाव करणाऱ्या खेळाडूंपैकी कोणीही आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्या खेळाडूंच्या अंगणास मध्य रेषेपलीकडे स्पर्श करता कामा नये. तसे केल्यास ते बाद होतील व प्रतिपक्षास तितके गुण मिळतील.
15. नियम क्रमांक 14 प्रमाणे बाद झालेल्या बचाव करणाऱ्या खेळाडूने जर चढाई करणाऱ्यास पकडले किंवा पकडण्यास मदत केली असेल तर विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व चढाई करणारा आपल्या अंगणात सुरक्षितपणे आला असे समजावे आणि ज्या बचाव करणारा खेळाडू अथवा खेळाडूंचा प्रतिपक्षाचे अंगणात स्पर्श झाला असेल त्यासच बाद म्हणून जाहीर करावे.
16. एखाद्या संघाने प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद केले अथवा प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद झाले व विरुद्ध पक्षाचा गडी कोणीच पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल तर त्या संघाने लोण केला असे समजावे व बाद केलेल्या खेळाडूच्या गुणाव्यतिरिक्त लोणचे दोन जादा गुण जाहीर करावेत. यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपल्या अंगणात दहा सेकंदात प्रवेश करतील अन्यथा पंच अथवा सरपंच प्रतिपक्षास तांत्रिक गुण जाहीर करतील. त्यानंतर एखादा संघ आपल्या अंगणात प्रवेश करीत नसेल तर सरपंच अशा संघास आपल्या अंगणात येण्याची सूचना करील. याउपरही तो संघ एक मिनिटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर तो त्या सामन्यापुरता बाद करून विरुद्ध संघ जिंकल्याचे जाहीर करावे.
17. चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करत असताना त्याला त्याच्या संघातील एखाद्या खेळाडूने अन्य प्रकारे सुचित केल्यास पंचाने अथवा सरपंचाने विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
18. चढाई करणाऱ्या किंवा बचाव करणारा खेळाडूस अवयव अथवा धड याशिवाय शरीराचे इतर कोणत्याही भागाने बुद्धीपुरस्पर पकडू नये जो या नियमांचा भंग करील तो खेळाडू बाद झाल्याचे जाहीर करावे. जर चढाई करणारा खेळाडू बुद्धिपुरस्सर याशिवाय शरीराच्या इतर भागांत पकडले असेल तर पंचाने अथवा सरपंचाने चढाई करणारा खेळाडू बाद नसल्याचे जाहीर करावे.
टीप:-
एखाद्या चढाई करणाऱ्यास जाणून-बुजून त्याचे कपडे अथवा केस धरून पकड केल्यास त्या खेळाडूला बाद म्हणून जाहीर करावे आणि नियम क्रमांक 18 चा भंग करणाऱ्या बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
19. प्रतिपक्षाच्या एक किंवा अनेक खेळाडू बाद झाले म्हणजे दरवेळी बाद करणाऱ्या संघाचा खेळाडू बाद झालेल्या क्रमांकाने जिवंत होतो.
-: सामन्या संबंधित नियम :-
1. संघ (Team): प्रत्येक संघात कमीत कमी 7 खेळाडू आणि जास्तीत जास्त 10 खेळाडू असतील. 7 खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उत्तरतील आणि उरलेले 3 खेळाडू राखीव म्हणून राहतील.
2. सामन्याची कालमर्यादा- (Duration of Match): लहान गटासाठी 7 मिनिटांचा व 5 मिनिटांचे विश्रांतीने आणि मोठ्या गटासाठी 10 मिनिटांचा व 5 मिनिटांची विश्रांतीने विभागलेल्या अशा दोन भागांची असेल. विश्रांतीनंतर अंगणाची अदलाबदल करावी. पहिला डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू असतील तितक्याच खेळाडूंनी दुसरा डाव सुरू करावा.
टीप:-
प्रत्येक डावाची शेवटची चढाई चालू असताना जर वर नमूद केलेली खेळाचे ठराविक वेळ संपली असेल तरीही ती चढाई पूर्ण होऊ द्यावी.
3. गुणपत्रक भरण्याची पद्धत (system of scoring):-
अ) प्रतिपक्षाच्या बाद झालेल्या प्रत्येक खेळाडू गणिक । गुण विरुद्ध संघाला मिळेल.
ब) अव्वल पकड (super tackle) केल्यास पकडीचा एक गुण व अधिकचा एक असे दोन गुण त्या संघास मिळतील.
क) जो संघ प्रति स्पर्धावर लोण देईल त्या पक्षास लोणचे दोन गुण मिळतील. गडी बाद होणे व जिवंत होणे हा नियम सामना संपेपर्यंत लागू राहील.
4. त्रुटित काळ (Time out): अ) संघनायक, संघशिक्षक किंवा कोणही सहभागी खेळाडू सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतर आगोदर दोन वेळा व मध्यंतरानंतरा दोन वेळा त्रुटित काळ मागू शकेल. मात्र अशा प्रत्येक त्रुटीत काळाची मर्यादा 30 सेकंदांपेक्षा जास्त नसेल. त्रुटित कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढाच वेळ उरलेल्या खेळात समाविष्ट करण्यात येईल.
ब) अशा त्रुटित काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येणार नाही. जो खेळाडू / संघ या नियमांचे उल्लंघन करील त्या संघाविरुद्ध एक तांत्रिक गुण जाहीर करण्यात येईल.
क) वीज पुरवठा बंद पडणे, मुसळधार पाऊस पडणे, लोकांनी व्यत्यय आणणे, खेळाडू जखमी झाल्यास, क्रीडांगणाच्या रेषा पुन्हा आखाव्या लागल्यास इत्यादी कारणास्तव पंच / सरपंच अधिकृत त्रुटित काळ घेऊ शकतात. त्रुटीत कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढा वेळ उरलेल्या वेळात समाविष्ट करण्यात येईल.
5. खेळाडू बदली करणे (substitution) :- अ) सरपंचाच्या परवानगीने 3 खेळाडू सामन्याच्या मध्यांतर व त्रुटीत कालावधीत बदलता येतील.
ब) बदललेला खेळाडू पुन्हा बदली खेळाडू म्हणून घेता येईल.
क ) जर एखादा खेळाडू सामन्यासाठी निलंबित अथवा सामना कालावधीसाठी बडतर्फ झाल्यास त्याचे एवजी बदली
खेळाडूस घेता येणार नाही. तो संघ तितक्या कमी संख्येने खेळ खेळेल.
ड) अधिकृत त्रुटित कालावधीत (official time out) खेळाडू बदलता येणार नाही.
इ) बाद झालेल्या खेळाडू एवजी बदली खेळाडू घेता येणार नाही.
6. बोनस गुण (Bonus Point):
अ) चढाई करणाऱ्यांनी बोनस रेषा ओलांडल्यास एक बोनस गुण जाहीर करावा. बोनस रेषा ओलांडल्यानंतर चढाई करणारा पकडला गेला तर तो बाद झाल्याचे जाहीर करावे व विरुद्ध संघास एक गुण द्यावा.
ब) अंगणात कमीत कमी सहा बचाव करणारे खेळाडू असतील तर बोनस नियम लागू होईल, बोनस गुण चढाई संपल्यानंतर पंच अथवा सरपंचाने आपल्या हाताचा अंगठा वर करून जाहीर करणे.
क) चढाई करणारा खेळाडू जर बोनस रेषा ओलांडत असताना पकडला गेला तर बोनस गुण जाहीर करता येणार नाही. क्षेत्र रक्षण करणा-या संघास एक गुण जाहीर करावा.
ड) चढाई करणा-यांनी बोनस रेषा ओलांडल्यानंतर जर बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून आपल्या अंगणात आला असेल तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
इ) चढाई करणाऱ्यांने बचाव पक्षातील खेळाडू अथवा खेळाडूंना स्पर्श करण्याअगोदर अथवा बचाव करणाऱ्यांनी चढाई करणाऱ्याची पकड करण्याअगोदर बोनस रेषा ओलांडली तरच बोनस गुण जाहीर करावा. स्पर्श अथवा झटापट झाल्यावर चढाई करणा-यांनी बोनस रेषा ओलांडली तर बोनस गुण देता येणार नाही.
फ) बोनस गुण जाहीर झाल्यास बाद खेळाडू जिवंत होऊ शकत नाही. ग) जर एक किंवा अनेक खेळाडू निलंबित अथवा बडतर्फ करण्यात आले असतील तरी बोनस रेषा ओलांडण्याच्या नियमानुसार ते खेळाडू अंगणात आहेत असे गृहीत धरून बोनस गुण जाहीर करावा,
7. अव्वल पकड (super tackle): अ) अंगणात तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू बचाव पटू असताना त्यांनी पकड केल्यास ती अव्वल पकड समजावे. पकड करणाऱ्या संघास पकडीच्या गुणा बरोबर एक जादा गुण म्हणजे एकूण दोन गुण द्यावेत. गुणपत्रिकेत या गुणांची नोंद करताना प्रथम पकडीचा गुण तिरपी रेषा (1) व नंतर अधिकचा गुण ब) अंगणात तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू बचाव पटू असताना चढाईपटू स्वयंचित झाल्यास ही अव्वल पकड समजावी.
गुणाकाराची रेषा (X) अशाप्रकारे नोंद करावी.
क) अंगणात चार बचाव पटू असताना त्यातील एक स्वयंचित झाला व उर्वरित तीन खेळाडूंनी चढाईपटू ची पकड केली तर ती अव्वल पकड समजावे.
ड) जेव्हा एक किंवा त्यापेक्षा जादा खेळाडू निलंबित असतील तर जेवढे खेळाडू निलंबित असतील ते अंगणात गृहीत धरून अव्वल पकड हा नियम अमलात आणावा.
इ ) अव्वल पकड हा नियम चढाईपटू व बचाव पटू दोघेही बाद असतानाही ग्राह्य मानला जाईल.
8. निर्णायक चढाई (Do or Die Raid): अ) चढाईमध्ये गुण मिळवणे अगर गुण गमावणे या क्रिया घडविणारी प्रत्येक चढाई निर्णायक चढाई समजली जाईल. पहिल्या दोन सलग चढ़ाया अनुत्पादित झाल्यास तिसरी चढाई निर्णायक चढाई असावयास हवी. या चढाई गुण न नोंदविल्यास चढाई अनुत्पादित समजून चढाईचा खेळाडू बाद दिला जाईल व विरुद्ध संघास एक गुण दिला जाईल. प्रत्येक डावाच्या सुरूवातीची चढाई ही त्या संघाची पहिली चढाई समजावी.
ब) खेळाडू, प्रशिक्षक किवा व्यवस्थापक त्यांना पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून विरुद्ध संघास तांत्रिक गुण जाहीर केल्यास हा गुण निर्णायक चढाईसाठी ग्राह्य धरता येणार नाही.
9. अंतिम निकाल (Result): संपूर्ण खेळ संपल्यानंतर ज्या संघाची गुण संख्या अधिक असेल तोच संघ विजय झाल्याचे जाहीर करावे.
10. बाद पद्धतीत समान गुण झाल्यास (Tie ):
1. दोन्ही संघात क्षेत्ररक्षणाकरिता सात खेळाडू अंगणात असतील आणि दोन्ही संघांना प्रत्येकी पाच चढायांची संधी आळीपाळीने दिली जाईल.
2 . अशा वेळी निदान रेषेवर क्षेत्ररक्षण करून खेळ खेळविला जाईल.
3. या वेळी निदान रेषा ही बोनस रेषा च्या नियमाप्रमाणे गृहीत धरले जाईल आणि बोनस रेषा चे सर्व नियम अमलात येतील.
4. चढाई करणा-यांनी बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडण्यास एक गुण दिला जाईल.
5. चढाई करणारा जर बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडून बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित आला तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
6. अशावेळी खेळाडू बाद किंवा जिवंत होणे ही प्रक्रिया अमलात न आणता फक्त गुण मिळाल्याचे गृहीत धरले जाईल.
7. पाच पाच चढ़ाया सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकाने पाच चढाई करणाऱ्या खेळाडूंचा क्रमांक व नाव या क्रमवारीत चढाई करण्यासाठी देणे आवश्यक आहे. अशा वेळी क्षेत्ररक्षण करताना 7 खेळाडूंपैकी खेळाडू बदलता येणार नाही.
8. सरपंच दिलेल्या क्रमवारीनुसार आळीपाळीने चढाई करण्यास सांगेल.
9. चढाईसाठी दिलेल्या यादीतील पाच खेळाडू पैकी जर एखादा खेळाडू त्याची चढाई पाळी येण्यापूर्वी दुखापत झाल्यास उर्वरित दोन खेळाडूंपैकी एकाला चढाईची पाळी देता येईल,
10. ज्या संघाने खेळ सुरू करताना प्रथम चढाई केली असेल त्याच संघास यावेळी पहिली चढाई दिली जाईल.
11. यानंतर ही समान गुण झाल्यास सुवर्ण चढाई या नियमाचा आधार घेता येईल.
टीप: या पद्धतीच्या खेळांमध्ये एक किंवा अनेक खेळाडू बडतर्फ किंवा निलंबित ठरल्यास तितके खेळाडू संख्येने कमी करून खेळ खेळविला जाईल बोनस गुण मिळविण्याच्या क्रियेत अशा खेळाडूंची संख्या गृहित धरले जाईल
12. सुवर्ण चढाईपाच पाच चढाई नंतरही जर सामना समान गुणांवर असेल तर चढाई करीता नव्याने नाणेफेक केली जाईल. जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाईल.
सुवर्ण चढाईनंतर ही सामना समान गुणांवर असेल तर प्रतिपक्षास सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाईल.
सुवर्ण चढाईत जो संघ निर्णायक गुण मिळविल तो संघ विजयी ठरविला जाईल. याउपरही सामना समान गुणावर संपला तर नाणेफेक करून सामना निर्णायक करावा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
खूप छान माहिती दिली.आपले खूप आभारी आहे.
ReplyDelete🙏💐🙏
Delete