केंद्रप्रमुख पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अपडेट - महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची सुधारित अधिसूचना 2024 प्रसिद्ध

 राज्य शासनाने केंद्रप्रमुख भरतीसाठी 50% पदोन्नतीतून व 50 टक्के विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून पदे भरण्याबाबत शासन निर्णय केला होता व त्यानुसार विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जाहिरात काढून तसे अर्ज देखील भरून घेतले होते परंतु सदर प्रकरणी शासनाने अधिसूचना निर्गमित केलेली नसल्यामुळे सदर प्रक्रिया पूर्ण झाली नाही.


दिनांक सहा ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने त्याबाबत सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे ती पुढील प्रमाणे.


सदर अधिसूचनेवर हरकती व सूचना दिनांक 5 सप्टेंबर 2024 पर्यंत ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबईला पाठवायचे आहेत.


सदर सुधारित अधिसूचनेनुसार

१. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, एकतर

(१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.

(२) शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार, त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने,

(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. किंवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. ची पदवी धारण केलेली आहे: (ब) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक

(प्राथमिक) म्हणून जिल्हा परिषदेत किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे; २. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.

३. (१) केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ मधील तरतुदींनुसार किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक आहे. (२) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक मुले असलेली व्यक्ती या नियमांनुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. (३) या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, अशा व्यक्तीस नियुक्तीच्या वेळी किंवा त्यांनतर त्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्यास, ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल.


४. केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल.

५. केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती;

(१) तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल :

(२) तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून काम करत आहे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही.

६. या नियमान्वये केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतीही संसाधने लागू राहतील.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सीमा जाधव,

शासनाच्या उप सचिव.




वरील सुधारित अधिसूचना संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. 

संदर्भ:-

- (१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई-१०९४/७०४/(एक)/प्राशि-१, दि.१४/११/१९९४

(२) शासन अधिसूचना क्र. सेवाप्र-२०१३/प्र.क्र.१०६/आस्था-९, दि.१०/०६/२०१४

(३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०१/१२/२०२२ वदि.२७/०९/२०२३

(४) शासनपत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.२७/०९/२०२३


प्रस्तावना :-

शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्र. (१) येथील दि. १४/११/१९९४ च्या शासन निर्णयान्वये राज्यात केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुख पदाचा मुळ तांत्रिक प्रशासकीय विभाग हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाची पदनिर्मीती, नियुक्ती, शैक्षणिक अर्हता व पदोन्नतीसंदर्भातील धोरण निश्चितीची कार्यवाही देखिल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात येते. मात्र, केंद्रप्रमुख हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित कार्यरत असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्रप्रमुख पदाबाबत वेळोवेळी विहीत करण्यात आलेल्या धोरणनिश्चितीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे यासंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात संदर्भाधीन संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संदर्भाधीन संदर्भ क्र. (४) येथील शासनपत्रान्वये सूचित केले आहे. केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती प्रक्रीयेची कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार करावी, की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, याबाबत क्षेत्रिय कार्यालयस्तरावर संभ्रम निर्माण होत असतो. परिणामी, प्रत्येक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात स्वतंत्ररित्या कार्यपध्दती वापरुन वेगवेगळी कार्यवाही केली जाते. त्यानुषंगाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या कार्यवाहीसंदर्भात राज्यात एकसूत्रता आणण्याच्या दृष्ट्रीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.


शासन परिपत्रक :-

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही ही विधीवत असल्याने, सदर विधीवत प्रक्रीयेस काही अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्र (३) येथील दि.०१/१२/२०२२ व दि.२७/०९/२०२३ च्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख पदासंदर्भात धोरणनिश्चितीप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्ररित्या सुरु आहे.

२. सबब, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक त्या सुधारणेसंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्र (३) येथील नमूद शासन निर्णयातील सुधारीत तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनसाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.

३. सदर शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेताक २०२३१२२७१३२७३३४५२० असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


 (पो.द. देशमुख)

उप सचिव, ग्राम विकास विभाग


वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. म्हणजे केंद्रप्रमुख भरती स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे का सर

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.