प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम
रयत शिक्षण संस्थेचे,
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ
अध्यापन कार्य
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य
१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य
चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.
*'बिकट वाटेलाच वहिवाट' बनविणारे एन. डी. सर*
-------------------------------
*प्रा. एन. डी पाटील सरांच्या नव्वदीच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रसिद्ध झालेला लेख*
- राजीव देशपांडे व अनिल चव्हाण
“सोपे रस्ते चालायला सोपे असले तरी ते तुम्हाला जिथे जायचे असेल तेथे पोहोचवतीलच असे नाही. म्हणून रोबर्ट फोर्स्त या इंग्लीश कवीच्या मला आवडणाऱ्या चार ओळी तुम्हाला सांगतो, woods are lovely, dark and deep but I have promise to keep, miles to go before I sleep, miles to go before I sleep. या चार ओळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याही खूपच आवडत्या होत्या. पण याच कवितेच्या पुढील ओळी मला त्याहूनही जास्त आवडतात. त्या बोधप्रद ओळी अशा आहेत , two road divert from the wood , I took one the less travelled by , and that has made all the difference. या वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते निघाले, त्यापैकी एक कमी मळलेला रस्ता मी निवडला. जे काही आज घडलय ते त्यामधूनच घडले आहे.”
गेली ७०-७५ वर्षे महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक-राजकीय-आर्थिक चळवळीचे केवळ साक्षीदारच नव्हे तर त्या चळवळीत आघाडीचा सहभाग असलेले डॉ. एन. डी. पाटील यांच्या एका भाषणातील हा वरील उतारा आहे.
महाराष्ट्राच्या विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनांचा विचार एन. डी. पाटील या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्यात एन.डी. सरांचे नाव सापडणार नाही. “बिकट वाटेलाच वहिवाट” बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगत गेली ७० वर्षे कार्यरत असणारा हा महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेता, विचारवंत, परिवर्तनाच्या चळवळीचा आधारस्तंभ, *अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष एन.डी.सर येत्या १५ जुलै, २०१८ला नव्वदीत प्रवेश करीत आहे. त्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी डॉ. एन. डी. पाटील सरांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.* हा अतिशय त्रोटक आढावा आहे. या माणसाच्या अफाट कर्तृत्वाला वार्तापत्राच्या मर्यादित पृष्ठसंख्येत सामावून घेणे केवळ अशक्य आहे.
पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील आणि आता सांगली जिल्ह्यात असलेल्या वाळवा तालुक्यातील ढवळी या जेमतेम पोट भरावे अशी आर्थिक स्थिती असलेल्या हजारभर वस्तीच्या गावात एन. डी. पाटलांचा जन्म झाला. १५ जुलै,१९२९ ही त्यांची शाळेत भरती होताना तेथील शिक्षकानी नोंदवलेली जन्म तारीख.
वाळवा तालुका क्रांतिकारकांचे आगार, प्रती सरकारच्या कार्याने आणि सत्यशोधकी विचाराने भारलेला. त्यामुळे बहुजनसमाजाला शिक्षणाची ओढ लागलेली. त्याचा प्रभाव ढवळी गावावरही. आपण निरक्षर असलो तरी मुलांनी निरक्षर राहता कामा नये ही जाणीव निर्माण झालेली. त्यामुळे एन.डी.च्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना, नारायण आणि शंकरराव यांना शाळेत दाखल केले. शाळेतील शिक्षकांनी नारायणची क्षमता ओळखली. शिक्षकानी त्यांच्या वडिलांना ढवळीपासून चार किमीवर असलेल्या बागणी येथील गावातील शाळेत घालण्यास भाग पाडले. बागणी येथील शिक्षकांनी नारायणला हायस्कूलात घालण्याचा आग्रह धरला. हायस्कूल आष्ट्याला, कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे,. ढवळीपासून आठ मैलावर. पण शाळेतील ध्येयनिष्ठ, सत्यशोधकी विचाराने भारलेल्या शिक्षकांच्या शिकवणुकीपुढे रोजच्या सोळा मैलाच्या पायपीटेचे नारायणला काहीच वाटेनासे झाले. इकडे नारायणचे सर्वात मोठे बंधू गणपतराव सक्रीयपणे स्वातंत्र्य चळवळीत सामील होते. क्रांतीसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी, जी.डी.लाड, नागनाथअण्णा नायकवडी, बाबूजी पाटणकर, कॉ. शेख काका, रंगराव दादा पाटील या सारख्या क्रांतीकारकांची त्यांच्या घरातील उठबस! त्यामुळे अशा वातावरणात कोवळ्या वयातील नारायणच्या मनात सत्यशोधकी आणि क्रांतीकारक विचारांची पायाभरणी झाली. त्याचे प्रत्यंतरही आलेच.
पेठवड गावी एक दारुचे दुकान जोरात चालले होते. ते दुकान बंद पाडण्याचा निश्चय नारायण आणि त्याच्या २०-२५ मित्रांनी केला व हे सर्व जण आठवड्यातून एक दिवस दहा मैलावरच्या पेठवडला सायकलवरून जात व त्या दुकानासमोर निदर्शने करत. या निदर्शनांसाठी शाळेतल्या शिक्षकानी त्यांना सुट्टीही दिली होती. या निदर्शनांमुळे त्या दुकानाचा महसूल एकदम घसरला. सरकार जागे झाले आणि पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या नारायणला अटक करून तुरुंगात टाकले. हा एन. डी. सरांचा पहिला तुरुंगवास, ते साल होते १९४५. त्यानंतर ते अनेकवेळा तुरुंगात गेले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असा एकही तुरुंग नाही, ज्यात एन. डी. गेलेले नाहीत.
गावातील अंबाबाईच्या देवळात कीर्तन चालू असताना ते बुवांना विचारत, “देव आहे का?” तर पिंपळकट्यावर बसून विचारत, “हा दगडाचा देव वर फेकला आणि तो कीर्तन करणाऱ्याच्या डोक्यात पडला तर कीर्तन करणाऱ्याच्या, ते ऐकणाऱ्याच्या डोक्यात पडेल की नाही? मग देव वाचवेल त्याना?” पुढील सार्वजनिक जीवनात घेतलेल्या बुद्धिवादी भूमिकेशी हे प्रश्न सुसंगतच होते.
घरात पाटील परिवाराच्या मालकीचा आड होता. गावातील सर्वजण तेथे पाणी भरत, पण दलितांना पाणी इतर वाढत, त्यांचा स्पर्श विहिरीला चालत नसे. नारायणच्या हे जेव्हा लक्ष आले, तेव्हा त्याने ‘हे चालणार असेल तर घरात पाउल ठेवणार नाही’, अशी धमकीच घरच्याना दिली. तेव्हापासून आड सर्वाना खुला झाला.
ज्या गावात जी जात प्रभावी त्या गावात वेगळ्या जातीचा मुख्याध्यापक नेमायचा असे कर्मवीर अण्णांचे धोरण असायचे. त्यानुसार आष्ट्याला जैन समाजाचे प्राबल्य असल्याने त्यांनी तेथे वेताळराव खैरमोडे या दलित मुख्याध्यापकाना नेमले होते. ते ज्ञानी होते, वाचन अफाट होते. कर्मवीर अण्णा त्यांना म्हणायचे, “हा माझा प्रती आंबेडकर”. अशा शिक्षकाच्या सान्निध्यात नारायणचा वैचारिक उत्क्रांतीचा पाया भक्कम झाला, नव्या विचारांची ओळख झाली, त्यांचे वाचन अफाट वाढले. परिणामी नारायण म्यट्रीकच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला व पुढील महाविध्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापुरातील राजाराम महाविध्यालयात दाखल झाला.
१९४२च्या ‘छोडो भारत’ लढयाने स्वांतत्र्य जवळ आल्याची लक्षणे दिसू लागली होती. स्वातंत्र्यानंतर सत्ता भांडवलदार वर्गाच्या हातात जाता कामा नये तर ती शेतकरी-कामगार-सामान्य माणसाच्या हातात आली पाहिजे या हेतूने स्वातंत्र्य चळवळीतून, पत्री सरकारच्या आंदोलनातून, सत्यशोधकी विचाराने तावून सूलाखून निघालेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी १९४६ मध्ये कॉंग्रेस अंतर्गत कॉंग्रेस शेतकरी कामकरी संघ स्थापन केला. स्वराज्याचे सुराज्य फक्त ‘समाजवादी’ व्यवस्थेतूनच होऊ शकते ही भूमिका मान्य असलेले कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. १५ ऑगस्ट १९४७ला देश स्वतंत्र झाला. कॉंग्रेसच्या घटनेनुसार शेतकरी कामगार पक्षाला कॉंग्रेस अंतर्गत स्वतंत्र अस्तित्व राखणे अशक्य बनले. परिणामत: शेतकरी कामगार पक्ष १९४८ मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडला व स्वतंत्रपणे काम करू लागला. १९५०च्या दाभाडी येथील अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाने मार्क्सवाद-लेनिनवादाचा अंगीकार केला.
अशा या पार्श्वभूमीवर पत्री सरकार सारख्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे सत्यशोधकी संस्कार घेऊन आलेला नारायण कोल्हापुरातील राजकीय वातावरणापासून दूर राहूच शकत नव्हता. शंकरराव मोऱ्यानी ‘जनसत्ता’ नावाचे साप्ताहिक सुरु केले होते. त्या अंकाचे गठ्ये खांद्यावर टाकत मथळे ओरडत ते अंक विकण्याचे काम नारायण करत होता. अशा प्रकारच्या कामातूनच त्याची समकालीन राजकीय-आर्थिक घडामोडीबद्दलची जाणीव आकार घेत होती तर सरकारकडून लेव्हीबाबत शेतकऱ्यावर होत असलेला अत्याचार, भाताच्या किंमतीबाबत महाराष्ट्र आणि गुजराथ या राज्यामध्ये सरकार करत असलेला पक्षपात, शेतकऱ्याची आंदोलने, शेतकऱ्याच्या ठिकठिकाणी भरत असलेल्या परिषदा या घटनांतून आकार घेत असलेली त्याची राजकीय जाणीव अधिकच प्रगल्भ होत होती.
अशा या राजकीय धामधुमीच्या काळातच नारायण पदवीधर झाला. पण त्याच सुमारास त्याच्या वडिलांचे आणि भावाचे एकाच वर्षी निधन झाले. हा त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर मोठाच आघात होता. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना आधार दिला व आष्ट्याच्या र्टेनिंग कॉलेजमध्ये कर्मवीरानी नारायणची नेमणूक केली व आता त्यांची ओळख प्रा. एन. डी. पाटील अशी होऊ लागली. येथेच त्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात ते आले. महात्मा गांधींच्या खुना नंतर उसळलेल्या दंगलीत देशपांडे इनामदाराचा वाडा वाचविणारे र्टेनिग कॉलेजचे प्राचार्य ए. डी. गणी साहेब अत्तार यांचा सर्वाधिक प्रभाव एन.डी.च्या जीवनप्रवासावर पडला.
तेथे एन. डी. सर इतिहास विषय शिकवीत. संध्याकाळच्या जेवणानंतरच्या बौद्धीकात सामाजिक बांधिलकीची जाणीव, शोषणाविरुद्धची चीड, समाजकार्याची आवड विध्यार्थ्यात निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत. रात्र रात्रभर मुलांच्या शंका चालत असत. पण अजिबात कंटाळा न करता ते मुलांच्या शंकांचे निरसन करीत. समाजासाठी स्वीकारलेली समर्पणवृत्ती अशी प्रारंभापासूनच त्यांच्यात भिनलेली होती. त्याच दरम्यान एन. डी. सरांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात एम.ए.ची पदवी घेतली.
सुरुवातीपासूनच त्यांच्या स्वभावात हळवेपणाला फारसे स्थान नव्हतेच. बुद्धीवादाचा भक्कम पाया, आयुष्याची दिशा निश्चित, परखडपणा, वास्तव स्वीकारण्याची त्यांची सहजवृत्ती, ही आजही जाणवणारी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये प्रारंभापासूनच त्यांच्या व्यक्तित्वात होती.
एन. डी. म्हणजे “मुक्काम पोस्ट एस. टी.” असेच म्हटले जायचे. सतत भ्रमंती. त्यावेळेसही त्यांची भ्रमंती चालूच असायची. त्यांच्या आईची तक्रार असे, “ह्यो नारायण फुडल्या दाराने येणार आणि मागल्या दारान पशार व्हणार. वर घरी आला तर ह्यो झोकांडा.” पण ही सारी भ्रमंती, आटापिटा,समर्पण एका बाजूला रयत शिक्षण संस्थेसाठी व्यापक अर्थाने ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील शेतकऱ्यांची मुले शिकावीत,ज्ञानीं, आधुनिक जगाला सामोरी जाणारी बुद्धिवादी व्हावीत यासाठी होता तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षासाठी व्यापक अर्थाने दाभाडी प्रबंधाने दिलेले मार्क्सवादी-लेनिनवादी तत्वज्ञान प्रत्यक्षात आणून कामगार-शेतकऱ्यांचा शोषणमुक्त आणि समताधिष्टीत समाज निर्माण करण्यासाठी होता. त्यामुळेच एन. डी. पाटील त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कामा बरोबरच रयतच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. या दोन्ही पातळ्यावरील त्यांचा संघर्ष जारी होताच.
महात्मा गांधींच्या खुनानंतर झालेल्या दंगलीच्या, जाळपोळी संदर्भात तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी काढलेल्या जातीयवाचक उद्गारांनी प्रक्षुब्ध झालेल्या कर्मवीरांनी खेरांवर सडकून टीका केली. त्या टीकेमुळे चिडून मोरारजी देसाईनी रयत शिक्षण संस्थेचे सरकारी अनुदानच बंद केले. त्यावेळी कर्मवीरांनी मुख्यमंत्र्याला सुनावले, “तुझ्या ग्रांट बंद करण्याला मी धूप घालत नाही. ही शिक्षण संस्था रयतेची आहे. गरज असेल तर रयत तिला तारेल, नाहीतर मारेल. तुझ्यासारख्याच्या जीवावर मी संस्था चालवत नाही.” त्यामुळे एन.डी. सरांसारख्या रयतच्या सच्च्या कार्यकर्त्याना सरकारचा राग येणे स्वाभाविक होते. त्याचबरोबर केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे, भापकर, इस्माईलसाहेब मुल्ला, भाऊसाहेब राऊत या प्रमुख नेत्यांनीही कर्मवीरांच्या बाजूने सरकारविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे सरकार नमले. रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरु झाले. याच सुमारास एन. डी.चे संस्थेतील कार्यक्षेत्र चौफेर बहरू लागले होते. गरीब घरच्या मुलामुलींसाठी कर्मवीरांनी “कमवा आणि शिका” हा प्रकल्प सुरु केला व त्या प्रकल्पाचा सूत्रधार म्हणून एन. डी. सरांची निवड केली. संस्थेचे दैनदिन कामकाज एन. डी. पाटलानी चालवावे अशीच कर्मवीरांची ईच्छा होती व त्यादृष्टीने एन. डी. सरांची जडण घडण चालू होती. त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या जात होत्या.
‘रयत’ची स्थिती जरी भक्कम असली तरी ‘शेतकरी कामगार पक्षा’ची स्थिती काही फारशी चांगली नव्हती. “शेकाप अजून आहे का?” अशा कुत्सित प्रश्नांना त्या पक्षाच्या नेत्यांना सामोरे जावे लागत होते. मग दाजीबा देसाई यांच्या सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, नव्या दमाने भेटी गाठी चालू झाल्या. त्यांनी साताऱ्याला येऊन एन. डी. पाटलांची भेट घेतली. पक्ष अडचणीत असताना आपण तुलनेने स्वास्थ्याची नोकरी करण्यात काय अर्थ? असा विचार करीत पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व कर्मवीर अण्णा परवानगी देणार नाहीत ही खात्री असल्याने त्यांना न सांगताच एन. डी. सरांनी मुंबईची वाट धरली आणि मुंबईत गिरणी कामगार युनियनचे सेक्रेटरी म्हणून काम सुरु केले. पण फार काळ ते रयतपासून लांब राहू शकले नाहीत. कर्मवीरांचे गंभीर आजारात निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे एन.डी. सरांना संस्थेचे सभासदत्व देण्यात आले आणि तेव्हापासून आजतागायत ते रयत शिक्षण संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्हीसाठी अहोरात्र राबत आहेत.
शोषणमुक्त आणि समतेवर आधरित समाजाची निर्मिती हे एन. डी. सरांचे स्वप्न होते. त्यासाठी ते स्वातंत्र्य लढ्यापासून ते अगदी आजतागायत प्रत्येक लढ्यात सहभागी झाले. गिरणी कामगारांचा लढा, गोवा मुक्ती संघर्ष, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, एक गाव एक पाणवठा, भूमिहीनांसाठीचा संघर्ष, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून केलेले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमार विरोधी आंदोलन, बहुजनांच्या शिक्षणाला ग्रासणाऱ्या श्वेतपत्रिके विरोधातील लढा, धरणग्रस्तांचे-विस्थापितांचे आंदोलन, मराठवाडा नामांतर आंदोलन, एनरोन हटाव आंदोलन, हमी भावासाठी शेगाव ते नागपूर विधानसभेवर पायी चालत काढलेली दिंडी, महाराष्ट्र राज्य वीज संघर्ष समितीचे आंदोलन, भूविकास बँकेच्या गैरकारभाराविरोधाचे आंदोलन, अन्याय्य कपाती करणाऱ्या साखर कारखानदाराविरोधातील आंदोलन, जागतिकीकरणाविरोधात केलेले सेझ विरोधी लढयासारखे विविध संघर्ष, अगदी अलीकडे कोल्हापुरातील टोलच्या विरोधात कॉ. गोविंद पानसरेच्या साथीने केलेले आंदोलन, असे अनेक लढे एन. डी. सरांनी आजवरच्या ९० वर्षाच्या आयुष्यात लढवले आहेत. हे संघर्षच खरे तर एन. डी. सरांच्या व्यक्तित्वाची ओळख आहे. पण त्या सर्व लढ्यांचा परामर्श काही आपण येथे घेऊ शकणार नाही. त्यामुळे काही संघर्षाच्या तपशिलाना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही येथे केलेला आहे.
१ मे १९६०ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. पण बेळगाव, निपाणी, कारवारचा प्रश्न मात्र तसाच लोंबकळत पडला तो आजतागायत तसाच आहे. यासाठी मोर्चे निघाले,आंदोलने झाली, धरणे धरण्यात आली, सत्याग्रह झाले, न्यायालयीन लढाई अजूनही चालू आहे. त्या सर्व कार्यक्रमात आघाडीवर राहात सीमाभागातील जनतेला न्याय देण्यासाठी एन.डी. सरांनी तुरुंगवासही भोगला.
तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणा संदर्भात काढलेल्या श्वेतपत्रिकेचे “महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप” उघड करण्यासाठी एन. डी. सरांनी “शिक्षण हे राष्ट्राने करावयाचे धर्मादाय काम नसून राष्ट्राच्या भविष्यकालीन विम्यासाठी केली जाणारी फलदायी गुंतवणूक आहे”, असे सरकारला ठणकावत सभागृहाबाहेर सर्व आमदारांच्या समोर चार तास भाषण केले व ह्या श्वेतपत्रिकचे काळे अंतरंग साऱ्या आमदारांच्या समोर खुले केले. त्याआधी साऱ्या महाराष्ट्रभर या बहुजनांच्या शिक्षणाच्या मुळावर आलेल्या श्वेतपत्रिकेविरोधात त्यांनी रान उठवले होते. पी. जी. पाटलासह त्यानी संपूर्ण महाराष्ट्रभर ४०० सभा घेतल्या. त्यामुळे कॉग्रेस पक्षाकडे विधानसभेत प्रचंड बहुमत असतानाही सरकारला संबंधित ठराव मागे घ्यावा लागला. विशेष म्हणजे त्यावेळेस एन. डी. सर कोणत्याच सभागृहाचे सभासद नव्हते. त्यानंतरही अगदी आजतागायत शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधातील प्रत्येक लढ्यात एन. डी. सरांनी संघर्ष करणाऱ्याना भक्कम साथ दिली आहे.
एन.डी. सर विधानपरिषदेत १८ वर्षे तर विधानसभेत पाच अशी एकूण २३ वर्षे आमदार होते. तर काही काळ सहकारमंत्री होते. आपल्या राजकीय जीवनात उठता बसता शेतकऱ्याचे नाव घेणारे अनेकजण आहेत. पण आपल्या वैधानिक कारकिर्दीत एन. डी. सरांनी कापूस एकाधिकार खरेदी योजना, पाण्याचे समान वाटप, शेतमालाचा किफायतशीर हमीभाव असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निकराला आणले आहेत. विधिमंडळात त्यांनी दिलेली विविध विषयावरील अभ्यासपूर्ण भाषणे त्यांच्या विद्व्तेची, व्यासंगाची आणि हजरजबाबीपणाची साक्ष आहेत.
रयत शिक्षण संस्था आणि एन. डी. पाटील हे एक अतूट नाते आहे. संस्थेच्या कार्याशी ते पूर्णतः एकरूप झाले आहेत. संस्थेच्या हिताचाच विचार कायम त्यांच्या डोक्यात असतो. गेल्या ५० वर्षात साध रुपयाच्या प्रवास खर्चाच ‘व्हावचर’ त्यांच्या नावावर नाही. त्यामुळे कोणतीही भीडमुर्वत न ठेवता ते संस्थेच्या हिताची भूमिका घेऊ शकतात.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने लढवलेल्या प्रत्येक लढ्यात मग तो शनी शिंगणापूरचा सत्याग्रह असो, जादूटोना विरोधी कायदा होण्यासाठी केलेला संघर्ष असो अगर नरेंद्र महाराजा सारख्या भोंदू बुवा बाबाच्या विरोधातील आंदोलन असो त्यांनी व्यक्तिश: आघाडीवर राहात सहभाग घेतलेला आहे. शक्य असेल त्यावेळेस महाराष्ट्र अनिसच्या महाराष्ट्र कार्यकारिणीला ते उपस्थित असतातच आणि कार्यकारिणीतील त्यांची उपस्थिती कार्यकर्त्यांना उत्साह, बळ तर देतेच पण प्रत्येकवेळी त्यांचे भाषण कार्यकर्त्याना काहीतरी नवा विचार देऊन जातेच. शहीद डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ दिले आहे. आजही अगदी नव्वदीत कोल्हापुरात प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला निघणाऱ्या ‘निर्भय मौर्निग वॉक’ला एन.डी. सर आवर्जून हजर असतात.
महाराष्ट्रातील गेल्या ५० वर्षातल्या छोट्या-मोठ्या डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी जनचळवळी, सामाजिक चळवळी यांच्यासाठी एन. डी. सर एक विश्वसनीय भक्कम आधारस्तंभ आणि मार्गदर्शक राहिले आहेत. चळवळीने त्यांना मदतीची हाक घ्यावी, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात एन. डी. सर हजर. मग त्यांना शक्य असेल तर सर्व करतील. ते त्या चळवळीसाठी मोर्चात येतील, धरणे धरतील, सत्याग्रह करतील, तुरुंगात जातील, मंत्रालयात बेधडक मंत्र्यांच्या दालनात शिरणार, परत त्या चळवळीना आपल्या पंखाखाली घेण्याची वृत्ती अजिबात नाही. चळवळीची स्वायत्तता, स्वतंत्र नेतृत्व आणि कार्यक्रमात्मक मुभा यांचा त्यांनी नेहमीच आदर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील चळवळीची माहिती अगदी त्या चळवळीचे कार्यकर्ते, वैचारिक भूमिका, त्या चळवळीने हातात घेतलेल्या प्रश्नांचे स्वरूप, पार्श्वभूमी, आकडेवारी याची संपूर्ण माहिती त्यांच्याजवळ असतेच. त्यांच्या सततच्या भटकंतीत त्यांचे वाचन, मनन, चिंतन, टिपण चालूच असते. त्या माहितीचा उपयोग चळवळीना कार्यकर्त्याच्या प्रबोधनासाठी नक्क्कीच होतो. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला नवे काहीतरी हमखास पदरात पडतेच. आज एन. डी. सर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांच्या हातात सत्ता नाही तरी शोषित, वंचित समाज घटक त्यांच्याकडे आपले प्रश्न, गाऱ्हाणी घेऊन येतात आणि एन.डी. सर या नव्वदीत त्यांना मदत करायला सरसावतात.
कोल्हापुरात ओरडून पक्षाचे मुखपत्र विकणारा पोऱ्या म्हणून आपली राजकीय कारकीर्द चालू केलेल्या ह्या पोऱ्याने आज लोकप्रतिनिधी, आमदार, विरोधी पक्षनेता, नामदार, आघाडी सरकारचा समन्वयक, पक्षाचा जेष्ठ नेता, जनचळवळीचा आधारस्तंभ असा लौकिक मिळवला. निरक्षर कुटुंबात जन्माला येऊन रयत सारख्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचला. या यशस्वी आणि सफल जीवनात त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांचे महत्वाचे योगदान आहे. अनिस वार्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या एन. डी. चा उल्लेख ‘एक वादळ’ असा करतात. संसाराच्या सुरुवातीपासूनची एन.डी.ची भ्रमंती त्यांनी आता सवयीचा भाग म्हणून स्वीकारली आहे. त्या सांगतात, “आता पायाच्या अधुपणामुळे, आजारपणामुळे बाहेर कार्यक्रमाला वैगेरे जाणे, फिरणे त्यांना अवघड झाले आहे. पण मुलांनी मला सांगितले आहे, शक्य असेल तेथे जाऊ देत, त्यांना अडवू नकोस. तो ‘माणसांतला माणूस’ आहे. सभोवती माणसे नसतील तर त्यांना अस्वस्थ वाटते.”
मुलांची जबाबदारी, सुरुवातीची संसारातील आर्थिक ओढाताण, त्यावर मात करण्यासाठी लग्नानंतर पूर्ण केलेले शिक्षण, त्यानंतरची शाळेतील नोकरी, आपल्या कार्यक्षमतेचा वेगळा ठसा उमटवत शाळेच्या मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचणे व एन.डी. सरांच्या लोकसंग्रहाच्यामुळे घरात होणारी उठबस, राजकारणातले चढ-उतार-ताण यांना सामोरे जाणे हे सारे सरोजताईनी हसतमुखाने पार पाडले. एन. डी. सरांनी जपलेली मुल्ये त्यांनीही तेवढ्याच निष्ठेने जपली. एव्हढेच नव्हे तर मुलांच्यातही उतरवली. एन. डी. सरांच्या मुलांनीही कधी सरकारी गाडी मिळावी किंवा खास वागणूक मिळावी असा आग्रह धरला नाही. मुलांचा मामा मुख्यमंत्री(शरद पवार) व वडील मंत्री असतानाही त्यांनी सरकारी कोट्यातून मिळत असलेला वैद्यकीय प्रवेश नाकारला, अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी रांगेत उभे राहूनच प्रवेश मिळविला. कोणताही सत्तेचा भपका एन. डी. सरांनी कधीच मिरवला नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही.
एन. डी. सर विचाराने पक्के मार्क्सवादी. अर्थातच त्यांचा ईश्वर, अध्यात्म वैगेरेवर अजिबात विश्वास नाही. पण त्यांचे वैशिष्ट्य हे की ही वैचारिक धारणा त्यांनी सार्वजनिक जीवनातही कायम ठेवली. मंत्रीपद स्वीकारल्यावर आपल्या हस्ते कोणतेही भूमिपूजन वा कोणतेही धार्मिक कार्यक्रम, विधी होणार नाहीत असा आदेश त्यांनी लगेच जारी केला. त्यांनी लोकांच्या धार्मिक श्रद्धा मान्य केल्या पण त्यांचा वापर आपल्या राजकारणाकरता केला नाही. कोणतेही कर्मकांड त्यांनी आपल्या व्यक्तिगत अगर कौटुंबिक आयुष्यात केले नाही. आपली विचारसरणी आणि आचार यात कमालीची सुसंगती त्यांनी राखली. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचा विवेक सतत जागृत असल्याचे दिसून येते. त्यांचा प्रचंड लोकसंग्रह वैचारिक किंवा व्यावहारिक तडजोडीतून निर्माण झालेला नाही तर लोकांच्या प्रश्नांची तड लावण्याच्या संघर्षशील भूमिकेतून निर्माण झालेला आहे. आपली विचारधारा, तत्वनिष्ठा कायम राखूनही इतका प्रचंड लोकसमुदाय आपल्या पाठीशी उभा करता येतो हे एन. डी. सरांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.
आज एका बाजूला जातीयवादी, धर्मांध, सनातनी, fasist शक्तींनी असहिष्णुता, धर्मांधता यासारखे प्रश्न तर दुसऱ्या बाजूला नवउदारवादी आर्थिक धोरणांनी बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न उभे केले आहेत. पुरोगामी डाव्या चळवळीसमोर या प्रश्नांच्या रूपाने खूप मोठी आव्हाने उभी आहेत. त्या आव्हानांना तोंड द्यायचे तर “केवळ धर्मनिरपेक्ष असणे उपयोगी नाही तर या नवसाम्राज्यवादी, नवउदारवादी आर्थिक धोरणांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे” अशी भूमिका असलेल्या एन. डी. सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाची आज खूपच गरज आहे. पण आज ९० व्या वर्षी एन.डी.सरांना पायाच्या अधूपणामुळे घराबाहेर फार फिरता जरी येत नसले, आंदोलनात उतरता येत नसले तरीही सरांच्या खोलीत पसरलेल्या तमाम मासिकांच्या, पुस्तकांच्या आणि वर्तमानपत्रांच्या आणि सतत त्यांच्याकडे राबता असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या गराड्यातील त्यांच्या केवळ ‘असण्या’मुळे आणि एन. डी सरांच्या संघर्षमय जीवनप्रवासाच्या आकलनामुळे या फॅसिस्ट शक्तीशी संघर्ष करण्याचे ‘बळ’ कार्यकर्त्यांना मिळत राहील हे मात्र निश्चित!
---------------------------
0 Comments