English Medium इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम(मातृभाषेतून शिक्षण)?

English Medium इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम(मातृभाषेतून शिक्षण)?

सर्वसाधरणपणे सर्व पालकांचा कल हा आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा दिसतो.



यासंदर्भात काही प्रश्न माझ्या मनात येतात....

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फक्त इंग्रजी माध्यमातूनच शिकवलं जातं का?

खरंच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत असलेले शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी निपुण आहेत का?

(या शाळापैकी बहुतांश शाळा ह्या विनाअनुदानित आहे यामुळे मिळणारे वेतन अतीशय तुटपुंजे आहे. मग निपुण असे शिक्षक तुटपुंज्या वेतनावर किती दिवस काम करू शकतात?)

ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिकणे देखील कठीण जाते अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून कितपत समजेल?

एक इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सम्पूर्ण माध्यमच इंग्रजी घेणे गरजेचे आहे का?

जर एखादी गणितीय किंवा वैज्ञानिक संकल्पना एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे मातृभाषेत लवकर समजेल की इंग्रजी माध्यमातून लवकरक समजेल?

इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी एखादी शंका विचारायची आहे तर आपण पालक म्हणून त्यांना कितपत इंग्रजी माध्यमातून समजावून सांगू शकतो?

हे सर्व आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जर आपण देऊ शकत असाल तर हो नक्कीच आपण आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालू शकता.

परंतु शिक्षक म्हणून आजपर्यंत काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा...

जेंव्हा तुम्ही तुमच्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता त्या वेळी त्याला दोन गोष्टींशी सामना करावा लागतो एक शैक्षणिक संकल्पना जी त्याला समजुन घ्यायची आहे आणि दुसरी म्हणजे इंग्रजी भाषा जी त्याचेसाठी अनोळखी आहे.

जर मी तुम्हाला एखादी सोपी गोष्ट अवघड पद्धतीनं समजून सांगितली तर काय होईल...? हो नक्कीच तुम्ही माझ्यावर चीडाल आणि मला म्हणाल एवढी सोपी गोष्ट अवघड पद्धतीनं समजून का बरं सांगितली?

मग तुमच्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालून जी गोष्ट त्याला त्याच्या मातृभाषेतून सहज समजू शकते ती त्याला इंग्रजी भाषेतून समजाऊन सांगण्याचा अट्टाहास कशासाठी?

एका बाजूला वेगळी भाषा बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक त्या विद्यार्थ्यांची भाषा शिकून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला आपण आपल्या पाल्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी शाळा उपलब्ध असून देखील त्याला वेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये घालतो.... 

मोजकेच विद्यार्थी संकल्पना व भाषेचा गुंता समजून घेत त्यांचं शिक्षण सुरळीत सुरू ठेवू शकतात आणि बहुतांश विद्यार्थी त्या गुंत्यात अडकून जातात आणि त्यांना मग ना संकल्पना समजु शकत, ना भाषा. मग त्याच्या शिक्षणाचं काय..?

माझ्या शाळेत जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन परंतू गुंत्यात अडककेला विद्यार्थी जेंव्हा प्रवेशित होतो त्यावेळी त्याची अवस्था खूप बिकट झालेली असते. त्याला धड मराठी वाचता येत नाही आणि इंग्रजी देखील वाचता लिहिता येत नाही. तो पुढील वर्गात आलेला असतो, मग अशा वेळी त्या विद्यार्थ्याला त्या वर्गांतल  अभ्यास शिकवावं की काय शिकवावं हा प्रश्न मला पडतो.. आणि पालकाने त्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून काय साध्य केले? हा देखील प्रश्न समोर उभा ठाकतो. कारण आपलं मुल हे नक्कीच प्रयोगासाठी प्रयोगशाळेतील उंदीर किंवा बेडूक नाही की ज्यावर आपण वेगवेगळे प्रयोग करू. मग त्याच्या क्षमता विकासणासाठी त्याला योग्य शाळेत योग्य माध्यमाच्या शाळेत योग्य वेळीच घालने योग्य ठरेल.

जपान, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड अशा प्रगत देशात अजूनही त्यांचे मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिलं जातं मग आपलाच वेगळा अट्टाहास कशासाठी..?

मला हे सांगून इंग्रजी भाषेचे महत्व मुळीच कमी करायचे नाही. इंग्रजी भाषा शिकणे महत्वाचे आहेच पण त्यासाठी शिक्षणाचं माध्यमच इंग्रजी घेणे हे मात्र मला संयुक्तिक वाटत नाही. इंग्रजी भाषा ही महाराष्ट्रात पहील्या वर्गापासून सर्व शाळेत शिकवली जाते. आणि जेंव्हा आपण एक भाषा चांगली शिकलो तर जगातील इतर इंग्रजी सकट कोणतीही भाषा आपण केंव्हाही शिकू शकतो यात कुणाचही दुमत नसावे..

मला आलेल्या काही अनुभवांवरून हा सर्व लेखनप्रपंच बाकी आपण सुज्ञ आहात..


धन्यवाद!


आपलाच..

प्रदिप जाधव

pradipjadhao.com


https://youtube.com/c/pradipjadhao





Post a Comment

6 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.