गीत शिवायन- लेखक/कवी श्री प्रमोद रामकृष्ण पवार - पुस्तक परिचय

      गीत शीवायन:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले व समस्त विश्वाचे प्रेरणास्रोत असलेले छत्रपती शिवजी महाराज यांचे जीवनचरित्र काव्य स्वरूपात मांडून समस्त शिवप्रेमींना एक आनंदाची पर्वणीच लेखक/कवी श्री. प्रमोद रामकृष्ण पवार यांनी वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

     जेव्हा त्यांनी 'गीत रामायण' वाचले आणि त्यांनी संकल्प केला की छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र काव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करूया व 'गीत शीवायन' ही कल्पना त्यांना सुचली ती व त्यांनी त्यांचा संकल्प आपल्या समोर 'गीत शीवायन' हे पुस्तक प्रकाशित करुन पुर्ण केला.

      शिवाजी महाराज यांचे जीवनावर अनेक काव्य आतापर्यंत लिहिली गेली, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग पोवड्याच्या स्वरूपात आपण आजपर्यंत ऐकली आहेत. परंतु संपूर्ण शिवचरित्र काव्य स्वरूपात लिहीण्याचा अर्थात हा पहिलाच प्रयत्न आहे.

लेखक/कवी श्री. प्रमोद रामकृष्ण पवार यांनी शिवचरित्र काव्य स्वरूपात लिहितांना ओव्या, अभंग, जात्यावरच्या ओव्या, पोवाडे, वासुदेवाची गाणी, भावगीते, प्रार्थना, संवाद काव्य, तालबद्ध काव्य, पारंपरिक गीते, लोकगीते, तालबद्ध वर्णन काव्य, गोंधळ अशा विविध काव्यप्रकार वापरले आहे.

जसे शिवाजन्म पूर्वीचा महाराष्ट्र वर्णन करतांना कवी म्हणतात

स्वकियांच्या तलवारी रक्षिती

दिल्ली विजापूर नगरला

नित्य अभिषेक शेंदरी

गाव वेशीच्या देवाला!

जनतेला ना वाली कोणी

नकोच जिणे - मरण बरे!

हे सर्व दृश्य बदलण्यासाठी कोणीतरी यावं ही अपेक्षा व्यक्त करतांना कवी म्हणतात

तु सूर्याचे तेज घेऊनी 

भाग्योदय होऊनी यावा !





          शिवाजी महाराजांचा जन्म व जनतेला झालेला आनंद मात्र लेखक/कवी जात्यावरच्या ओव्या, पोवाडे व वासुदेवाची गाणी लिहून व्यक्त करतात आणि शिवाजी महाराजांचा नामकरण सोहळा पाळण्या च्या स्वरूपात आपल्या समोर मांडतात.

मातृशब्द हा प्रमाण 

रयत हिताचे भान

जीव जिजाऊंनी

राष्ट्रार्थ अर्पिला! शिवबा जन्मला....


जिजाऊंनी शिवरायांना कसे शिक्षण दिले हे वर्णन करतांना कवी म्हणतात की,


रपेट घोड्यावर घडविली, असतांना गर्भार

जन्माआधी दृढ करविला, भागीरथी निर्धार

वरद दायिनी, सावली दाता, दिव्य कल्पतरू

माऊली पहिला गुरू......

छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवनातील अनेक प्रसंग लेखक/कवी पोवड्याच्या स्वरूपात आपल्या समोर मांडतात. तो प्रसंग तो पोवाडा वाचतांना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. असे शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग लेखक/कवी पोवाड्याच्या स्वरूपात आपल्या समोर मांडतात.

शिवा न्हाविची निष्ठा वर्णन करतांना कवी म्हणतात...

'शिवा' बोलला 'शिवरायांना', ही कामगिरी मज द्यावी

मी वठवतो सोंग तुमचे, जीवाची पर्वा नाही

शिवाजी बनून मरण्यासाठी, मोहरुन गेलाय माझा प्राण

राजे नका करू अनमान, तुम्हाला जगदंबेची आण !

 अतीशय सुंदर शब्दात काव्यरचना करून छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र काव्य स्वरूपात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखक/कवी श्री प्रमोद पवार यांनी केला आहे आणि आपल्या सारख्या वाचकांना या महाकाव्या चा संपूर्ण रसास्वाद घेण्यासाठी व शिवचरित्रातून पुन्हा एकदा नवप्रेरणा घेण्यासाठी व शिवप्रेमींना नियमित पारायनासाठी नक्कीच हे पुस्तक विकत घेऊन वाचावे लागेल आणि संग्रही ठेवावे लागेल.


धन्यवाद!!


आपलाच

प्रदिप गणपत जाधव

राज्य पुरस्कार (महाराष्ट्र शासन) प्राप्त शिक्षक







Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.